![]()
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र (Validity) रद्द केल्याच्या प्रकरणावरून त्यांनी राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा कट राज्य सरकारकडून मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी जाणीवपूर्वक कट रचला जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांच्या प्रमाणपत्रांची वैधता (Validity) धोक्यात आणून मराठा समाजाच्या मुलांचे शैक्षणिक आणि नोकरीचे नुकसान करण्याचा सरकारचा डाव आहे. चंद्रशेखर बावनकुळेंवर गंभीर आरोप महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी नोंदी रद्द करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘एन्डोर्समेंट’ करून पत्र दिल्याचा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला आहे. हे पत्रही त्यांनी माध्यमांना दाखवले. बावनकुळेंना एवढी ताकद दिल्यास भाजपचे 20 ते 25 आमदार पाडण्याचा इशाराही त्यांनी फडणवीसांना दिला आहे. राजकीय द्वेषातून कारवाई काही विशिष्ट राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून राजकीय द्वेषापोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एखादा उमेदवार निवडून आला नाही, म्हणून त्यांच्या रागापोटी मराठा समाजातील हजारो मुलांचे वाटोळे केले जात आहे, असे ते म्हणाले. पुरावे असूनही प्रमाणपत्रे रद्द यशवंता दहीहंडे आणि बोडखे कुटुंबाचे उदाहरण देत जरांगे यांनी सांगितले की, उर्दू आणि मोडी लिपीतील जुन्या (निझामकालीन व इंग्रजकालीन) नोंदी सापडूनही आणि सबळ पुरावे सादर करूनही जात पडताळणी समितीकडून जाणूनबुजून प्रमाणपत्रे रद्द केली जात आहेत. यासंदर्भात वंशावळ समितीचा आदेश असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 15 लाखांच्या लाचेचा उल्लेख काही प्रकरणांमध्ये प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून 15 लाख रुपयांची लाच मागितली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आणि संबंधित अधिकाऱ्यांची ‘नार्को टेस्ट’ करण्याची मागणी केली. एकनाथ शिंदेंवरही तीव्र नाराजी जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही ‘डबल गेम’ खेळत असल्याचा आरोप केला आहे. मराठा आरक्षणाबाबत शिंदे सरकार प्रामाणिक असल्याचे वाटत होते, पण आता त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मराठा समन्वयक आपल्या (जरांगेंच्या) विरोधात छत्रपती संभाजीनगरमधील एका महाविद्यालयात बैठका घेऊन आंदोलने रचत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. “मराठा समाजाने तुम्हाला सत्तेत बसवले आहे, पण जर तुम्ही आमच्याच मुलांच्या भविष्याशी खेळणार असाल, तर आगामी 2029च्या निवडणुकीत तुमचा दारुण पराभव करू,” असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. हेही वाचा.. अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघात:भरधाव ट्रकने कामगारांना चिरडले; तिघांचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर अमरावती जिल्ह्यातील सावर्डीजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना भरधाव ट्रकने कामावरील मजुरांना चिरडले. या भीषण धडकेत ट्रकचालकासह दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा
Source link
पुरावे असूनही कुणबी प्रमाणपत्रे रद्द!:मनोज जरांगे सरकारवर भडकले; देवेंद्र फडणवीसांसह बावनकुळेंनी कट रचल्याचा गंभीर आरोप