![]()
सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलगुरू पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी ‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्तीला ‘समाज घडवणारी योजना’ असे संबोधले. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती केवळ आर्थिक मदत नसून, संपूर्ण कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास साधणारी योजना असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात डॉ. मुजुमदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात सोमेश्वर फाउंडेशनतर्फे 647 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रमुख डॉ. विद्याधर अनासकर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम, माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, नगरसेविका सपना छाजेड, अंजली ओरसे, पूजा जागडे, निशा मानवतकर, नगरसेवक अमित गावडे, अपूर्व खाडे, रवींद्र साळेगांवकर, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद वाळंज, सोमेश्वर फाउंडेशनच्या माजी नगरसेविका स्वाती निम्हण, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, आदित्य माळवे आणि कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. मुजुमदार यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, शिक्षणावर जीडीपीच्या किमान सहा टक्के खर्च करणारे देश विकसित होतात. भारतातही शिक्षणावर अधिक गुंतवणूक आवश्यक असून, सनी निम्हण हे आपल्या वडिलांचा सामाजिक वारसा पुढे नेत विद्यार्थ्यांबरोबरच सक्षम समाज घडवण्याचे कार्य करत आहेत. डॉ. विद्याधर अनासकर यांनी या शिष्यवृत्तीला विद्यार्थ्यांवरील विश्वासाचे प्रतीक म्हटले. या मदतीच्या आधारावर विद्यार्थ्यांनी यश मिळवून समाजाचे ऋण फेडण्याची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सनी निम्हण यांच्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले आणि ही समाजाला दिशा देणारी कृती असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे आयोजक सनी निम्हण यांनी तरुणांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून संस्कृती जपण्याचे आवाहन केले. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील स्वर्गीय विनायक निम्हण यांच्या कार्याचा आदर्श घेऊन ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात सोमेश्वर फाउंडेशन शिक्षण व आरोग्य क्षेत्रात आणखी विविध उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी विनायक निम्हण यांच्या विकासदृष्टीचा गौरव करत सनी निम्हण यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले. नीलेश निकम यांनी ही शिष्यवृत्ती इतरांसाठी आदर्श ठरेल, असे मत व्यक्त केले. प्रा. सुरेश नवले यांनी शिक्षण व आरोग्य सुविधा सर्वांसाठी मोफत झाल्यास देशात मोठी सामाजिक क्रांती घडू शकते, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले, तर प्रास्ताविक सनी निम्हण यांनी केले.
Source link
सोमेश्वर फाउंडेशनतर्फे 647 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान:डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले- ही समाज घडवणारी योजना