![]()
हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल पंपाचा ताबा घेण्याच्या वादातून इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसमत तालुक्यातील चोंढी येथील पेट्रोल पंपाबाहेर हा प्रकार घडला. कंपनीचे व्यवस्थापक महेश शेळके हे पंपाचा ताबा घेण्यासाठी पथकासह गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेळके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर चोंढी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पेट्रोल पंपाच्या ताब्यावरून झालेला वाद थेट हत्येपर्यंत पोहोचल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत हल्ल्याचा निषेध केला आहे. ताबा घेण्यासाठी कंपनीचे पथक पंपावर मिळालेल्या माहितीनुसार, चोंढी येथील पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी इंडियन ऑइल कंपनीचे व्यवस्थापक महेश शेळके आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोल पंपावर गेले होते. कंपनीकडून पंपाचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू असताना पंप मालकाशी त्यांचा वाद झाला. ताबा देण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची सुरू झाली. सुरुवातीला झालेला वाद काही वेळातच वाढला. याच दरम्यान पंप मालक आणि त्याच्या मुलाकडून शेळके यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्यात आले. हा हल्ला पेट्रोल पंपाच्या बाहेर झाल्याची माहिती आहे. रक्ताच्या थारोळ्यात कोसळले हल्ल्यात महेश शेळके गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने ते घटनास्थळीच कोसळले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर मदतीचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला. कंपनीच्या अधिकाऱ्याची अशा प्रकारे हत्या झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली. हल्ल्यात वापरण्यात आलेल्या शस्त्रासह इतर पुरावे पोलिसांकडून तपासले जात आहेत. पाच आरोपींविरोधात गुन्हा या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंपाचा ताबा घेण्यावरून नेमका वाद कशामुळे झाला, हल्ल्यावेळी घटनास्थळी कोण कोण उपस्थित होते, तसेच हल्ल्यात प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थिती, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि उपलब्ध पुरावे तपासले जात आहेत. या हत्येमागे केवळ पेट्रोल पंपाचा ताबा हा मुद्दा होता की त्यामागे आणखी काही कारण होते, याचाही तपास केला जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडून निषेध दरम्यान, इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्याची हत्या झाल्याची माहिती समोर आल्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महेश शेळके यांच्या हत्येबद्दल दुःख व्यक्त केले आणि घटनेचा निषेध केला. तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कंपनीच्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारे हल्ला होऊन त्यांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाकडे आता गांभीर्याने पाहिले जात आहे. एका पेट्रोल पंपाचा ताबा घेण्याच्या वादातून सुरू झालेला वाद थेट हत्येपर्यंत पोहोचल्याने हिंगोली जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या तपासातून या हत्येचे नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे. हेही वाचा… ‘बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही’:पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत अर्धा तास केवळ राज्याच्या दुष्काळावर चर्चा केली- एकनाथ शिंदे सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परभणीमध्ये शिवसेनेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांना सायकल आणि शिलाई मशीनचे वाटप केल्यानंतर केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. याचवेळी त्यांनी मोदींसोबत नुकत्याच झालेल्या भेटीचा खुलासा करताना सांगितले की, पंतप्रधानांनी त्यांना भेटीसाठी एक तासाचा वेळ दिला होता आणि त्यापैकी तब्बल अर्धा तास त्यांनी केवळ महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. सविस्तर वाचा….
Source link
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्याची हत्या:मालक आणि मुलावर आरोप; केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखल, हरदीप सिंह पुरींचे ट्विट