![]()
पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव पार्कमधील कथित राड्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता आणखी धार आली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवराज मोरे यांच्यावर आरोप करत कथित घटनेचा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर युवक काँग्रेसचे नेते शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच नवनाथ बन यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.‘महिलेला मदत करणे हा गुन्हा असेल तर हा गुन्हा आम्ही हजार वेळा करू,’ असे म्हणत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एवढेच नव्हे तर, या संपूर्ण प्रकरणात सत्य समोर आणण्यासाठी आपली आणि नवनाथ बन यांची नार्को टेस्ट करण्याचे थेट आव्हान त्यांनी गृहखात्याला दिले. मोरे म्हणाले, “मी आजही तयार आहे. सर्व माध्यमांना घेऊन मुख्यमंत्री महोदयांना भेटणार असून, माझी नार्को टेस्ट करा आणि नवनाथ बन यांचीही नार्को टेस्ट करा, अशी मागणी करणार आहे. कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय, हे सर्वांसमोर येईल.” राजकीय विरोधकांकडून आपले कॅरेक्टर असॅसिनेशन केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘महिलेला मदत करणे गुन्हा असेल तर हजार वेळा करू’ नवनाथ बन यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना शिवराज मोरे यांनी म्हटले की, “एका महिलेला मदत करणे हा जर हिंदुस्थानात गुन्हा असेल, तर हा गुन्हा आम्ही हजार वेळा, लाख वेळा करू. कोणत्याही महिलेला मदत करण्यापासून आम्ही मागे हटणार नाही.” बन यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी डिफेमेशन केस दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकारांनी 100 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याबाबत विचारले असता मोरे यांनी आपण 50 कोटी रुपयांचा दावा करणार असल्याचे सांगितले. ‘त्या मुलीला त्रास देऊ नका’ या प्रकरणातील संबंधित तरुणीनेही आपली बाजू मांडली असून, तिच्या करिअरचा विचार करून तिला त्रास देऊ नये, असे आवाहन शिवराज मोरे यांनी केले. संबंधित तरुणी आणि तिची आई स्वतः पुढे येऊन आपली बाजू मांडू इच्छित असल्याचे त्यांनी सांगितले. मोरे यांच्या म्हणण्यानुसार, “ती मुलगी आहे, तिचे करिअर आहे. तिला त्रास देऊ नका, ही सर्वांना विनंती आहे. तिला आमच्या लोकांनी मदत केली होती. या प्रकरणात जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे.” ‘एमपीएससी आंदोलनावर नवनाथ बन का बोलत नाहीत?’ एमपीएससीच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत मोरे यांनी नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला. “युवक काँग्रेसचा अध्यक्ष चार दिवसांपासून उपोषण करत आहे, ऋषिकेश, प्रियांका आणि इतर कार्यकर्ते उपोषण करत आहेत. त्याबद्दल नवनाथ बन काही बोलत नाहीत. मात्र माझ्याविरोधात आरोप करण्यासाठी ते बोलत आहेत,” असे शिवराज मोरे म्हणाले. तसेच आंदोलनादरम्यान मदतीसाठी कोणत्याही व्यक्तीचा फोन आला, तर उपोषण सुरू असतानाही आपण मदतीला धावून जाऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. “एक दाणाही न खाता तिथे पोहोचेन आणि मदत करेन. हे माझे दायित्व आहे,” असे ते म्हणाले. ‘नवनाथ बन यांना तुम्हीच मोठे केले’ नवनाथ बन यांच्या आरोपांवर टीका करताना मोरे यांनी त्यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचीही टीका केली. माध्यमांनी त्यांना जास्त महत्त्व देऊ नये, असे आवाहन करत शिवराज मोरे यांनी नवनाथ बन यांच्यावर बोचरी टीका केली.या प्रकरणावरून मुख्यमंत्री आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना पत्र देणार असल्याचेही शिवराज मोरे यांनी सांगितले. “राज्यात एवढ्या मोठ्या पक्षाची सत्ता आहे. कमीत कमी अभ्यास करून बोलणारे चांगले प्रवक्ते नेमा,” अशी विनंती आपण पत्राद्वारे करणार असल्याचे ते म्हणाले. सीसीटीव्ही फुटेजवरही सवाल कोरेगाव पार्कमधील घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजबाबत विचारले असता मोरे यांनी पोलिसांसह एका खासगी व्यक्तीनेही सीसीटीव्ही फुटेज घेतल्याचे सांगितले. या प्रकरणात तपास यंत्रणा आपले काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एका घटनेचा संदर्भ देत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. तसेच व्यवस्थेत काही लोकांकडून अडथळे निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र ‘गद्दार’ या वक्तव्याचा अर्थ आपल्या कार्यकर्त्यांबाबत नसून व्यवस्थेतील लोकांबाबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित तरुणीने काय सांगितले? दरम्यान, या प्रकरणातील संबंधित तरुणीनेही आपली बाजू मांडली. नवनाथ बन यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आणि खोटे असल्याचा दावा तिने केला. ती म्हणाली की, “मी ज्या परिस्थितीतून गेले आहे, ती खूप चुकीची होती. राजकारणासाठी माझे कॅरेक्टर असॅसिनेशन केले जात आहे. नवनाथ दादांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. एका स्त्रीचे कॅरेक्टर असॅसिनेशन होत असल्याचे मला वाईट वाटते.” शिवराज मोरे हे आपल्या भावासारखे असून, संबंधित तरुणाकडून आपल्याला त्रास आणि धमकावणे सुरू असल्याने आपण त्यांची मदत घेतल्याचेही तिने सांगितले. तिच्या म्हणण्यानुसार, ती संबंधित तरुणाच्या संपर्कात काही महिन्यांपासून होती. त्यानंतर त्याच्याकडून त्रास आणि ब्लॅकमेलिंग सुरू झाले. याप्रकरणी ती पोलिस ठाण्यातही गेली होती. त्याच वेळी ती तारीक दादा आणि शिवराज मोरे यांच्या संपर्कात आली आणि त्यांनी मदत केल्याचा तिचा दावा आहे. कोरेगाव पार्कमध्येही संबंधित तरुणाने येऊन तिला धमकावले आणि तिच्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत तिने पोलिसांना तसेच शिवराज मोरे यांना फोन केला. त्यानंतर मोरे आणि इतर लोक तिच्या मदतीसाठी आल्याचे तिने सांगितले. “मला फक्त मदत हवी होती. ते माझ्या मदतीसाठी आले आणि त्यांनी मला मदत केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मात्र आता या सगळ्या प्रकरणाचे राजकारण केले जात असल्याने मला वाईट वाटत आहे,” असे संबंधित तरुणीने स्पष्ट केले. या आरोप-प्रत्यारोपांमुळे एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव पार्कमधील कथित घटनेचा मुद्दा आता राजकीय वर्तुळात चांगलाच तापला असून, शिवराज मोरे यांनी जाहीर केलेल्या कायदेशीर कारवाईनंतर या प्रकरणाला पुढे कोणते वळण मिळते, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा… गोकुळ निवडणुकीत महायुतीचा एकतर्फी विजय होईल:90 टक्के ठराव आमच्याकडे, महाडिकांचा सतेज पाटलांना टोला गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीतील चारही घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून, गोकुळमधील तब्बल 90 टक्के ठराव महायुतीकडे असल्याचा दावा भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीचा एकतर्फी विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सविस्तर वाचा…
Source link
नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे आक्रमक:‘नार्को टेस्ट करा’, 50 कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याचा इशारा; तरुणीनेही आरोप फेटाळले