![]()
पुणे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने ओैंधमधील राहत्या घरात पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. नीलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५, रा. नागरस रस्ता, औंध) असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पाटील हे विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक होते. पुणे पोलिस दलात भरती झाल्यानंतर ते पदोन्नतीने (श्रेणी) पोलिस उपनिरीक्षक झाले. उच्च न्यायालयातील कामासाठी ते बुधवारी (७ ऑक्टोबर) मुंबईला जाणार होते. मात्र, ते मुंबईला गेले नाही. ओैंधमधील नागरस रस्त्यावरील एका सोसायटीत ते राहत होते. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते घरी होते. त्या वेळी त्यांचा मुलगा घरात होता. घरातील सोफ्यावर बसलेल्या पाटील यांनी शासकीय पिस्तुलातून गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर त्यांचा मुलगा खोलीतून बाहेर आला. तेव्हा पाटील हे सोफ्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. ‘पोलिस उपनिरीक्षक नीलेश पाटील यांना आरोग्यविषयक समस्या होत्या. गणेशोत्सवापूर्वी ते एक ते दोन महिने सुट्टीवर होते. गणेेशोत्सवातील बंदोबस्तासाठी ते कामावर रूजू झाले होते. आरोग्यविषयक समस्या जाणवू लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यात होते. त्यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे,’, असे चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले. पाटील यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. ते पूर्वी खडक पोलिस वसाहतीत राहत होते. पाटील यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस दलात शाेककळा पसरली.
Source link
पुण्यात पोलिस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या:औंधमधील राहत्या घरात घडली घटना, कारण अस्पष्ट