![]()
पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन हे देशभर गेले आहे. देशातील हजारो युवक यामध्ये सहभागी होणार आहेत. पेपर फुटतात कसे ? , आंदोलनाची वेळ का येते ? असा सवाल करताना या सरकारच्या हेतूबद्दल शंका असून पेपर फुटी मागचा आका कोण हे तपासा व त्याला पकडा, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. पुणे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेस नेते तथा माजी शिक्षण मंत्री थोरात यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार, माजी मंत्री डॉ.विश्वजीत कदम, शिवराज मोरे, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते. माजी मंत्री थोरात म्हणाले, विद्यार्थ्यांनाही आंदोलन करण्याची वेळ का येते ? पेपर फुटतात कसे ? हा मोठा प्रश्न असून या सरकारच्या हेतू बद्दल मोठी शंका आहे. गोरगरिबांची, सर्वसामान्यांची मुले लहानपणापासून अभ्यास करतात. आई, वडील काबाडकष्ट करतात. एक वेळ अशी येते की, आपल्या मुलांनी मोठे व्हावे. कर्तबगारी दाखवावी. ही मुले रात्रंदिवस अभ्यास करतात आणि अचानक पेपर फुटतो. सर्व भ्रमनिरास होतो. पोलीस भरतीमध्ये काही संशय निर्माण झाल्याने तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर.आर. पाटील यांनी पोलीस भरतीमध्ये शिस्त लावली. जी आजपर्यंत सुरू आहे. त्यामध्येही आता या सरकारच्या काळात गडबड होण्याची शक्यता आहे. देशामध्ये लोकशाही राज्यघटना राहणार की नाही हे युवकांनी ठरवले पाहिजे.
Source link
पेपर फुटी मागचा आका कोण हे तपासा : थोरात:पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा