.

अकोला शहरातील सार्वजनिक ई-बससेवेसाठी खडकी डेपो येथे इंटिग्रेटेड ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टिम विकसित करण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे शहरातील बससेवेचे स्वरूप संपूर्णपणे डिजिटल, तंत्रज्ञानाधारित होणार आहे. महापालिकेची ई-बस नेमकी कुठे आहे, थांब्यावर किती वेळात पोहोचेल, बसमध्ये किती प्रवासी आहेत, तिकिटांची किती विक्री झाली, दिवसभरात किती उत्पन्न मिळाले, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ही सर्व यंत्रणा हाताळण्यासाठी १० वर्षांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. ई-बसच्या प्रवाशांना मोबाइलवरून बसचे थेट लोकेशन पाहता येणार आहे. ऑनलाइन तिकीट काढणे, प्रवासाचे नियोजन करणे, बससेवेबाबत तक्रार नोंदवण्याची सुविधाही मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीनच्या माध्यमातून वाहकांना प्रवाशांना तिकिटे देता येतील. रोख रकमेबरोबरच यूपीआय, रुपे कार्ड, डेबिट-क्रेडिट कार्ड, मोबाइल ॲपच्या माध्यमातून भाडे भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी डिजिटल तिकीट, विविध प्रकारचे पासही उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मासिक पास, दैनिक पास, विद्यार्थी पास, दिव्यांग आणि सैन्यदलातील कर्मचाऱ्यांसाठी आवश्यकतेनुसार पासची सुविधा दिली जाणार आहे. या संपूर्ण व्यवहाराची नोंद होणार आहे.
व्यवहारांमध्ये पारदर्शकता येणार वाहकांना दररोज तिकीट विक्रीतून आलेले उत्पन्न महापालिकेच्या खात्यात जमा करावे लागणार आहे. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड स्कॅन करून तिकिटांची वैधता तपासता येईल. विनातिकीट प्रवास किंवा अधिक प्रवास केल्यास दंडात्मक तिकीट प्रवाशांना दिले जाणार आहे.
ॲपमध्ये मिळेल सर्व माहिती ^ई-बससाठी प्रवाशांना सर्व माहिती मोबाइलमधील ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. सोबतच बसचे लोकेशन, क्यूआर तिकीट मिळणार आहे. रोख स्वरूपातही तिकीटाची व्यवस्था असेल.दहा वर्षांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. ही प्रक्रिया सुरू आहे. – डॉ. सुनील लहाने, आयुक्त – मनपा अकोला
ॲपवरूनच करता येणार प्रवाशांना तक्रारी – अकोला महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (एएमपीएमएल) नावाने ॲप विकसित करण्यात येणार आहे. प्रवाशांना जवळचा बसथांबा शोधणे, उपलब्ध मार्गांची माहिती घेणे, बसचे थेट लोकेशन पाहणे, बसच्या आगमनाची वेळ जाणून घेणे, प्रवासाचे नियोजन करणे शक्य होईल. मोबाइलवरून डिजिटल तिकीट काढणे, पास मिळवण्याची सुविधाही असेल. विशेष म्हणजे बसमधील गर्दीचा अंदाज रंगांच्या माध्यमातून दाखवण्यासाठी ‘एआय’ आधारित ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती उपलब्ध होणार आहे. प्रवाशांना बससेवेबाबत काही तक्रार असल्यास मोबाइल ॲपवरून तक्रार नोंदवता येईल. तक्रारीसोबत छायाचित्र, आवश्यक माहिती जोडण्याची सुविधा असेल.
तिकीट कसे मिळणार? {बसमधील ईटीआयएम मशीनवरून मिळणार तिकीट {यूपीआयद्वारे डिजिटल पेमेंट करून तिकीट. {रुपे स्मार्ट कार्डद्वारे तिकीट. {मोबाइल ॲपवरून ऑनलाइन तिकीट बुकिंग. {क्यूआर कोड तिकीट ईटीआयएमवर तपासले जाणार. {मासिक, विद्यार्थी आणि दिव्यांगांसाठी पासची सुविधा. प्रत्येकी दिवशी बसेसमधून किती तिकिटांची विक्री झाली, रोख, डिजिटल माध्यमातून किती पैसे जमा झाले, कोणत्या वाहकाने किती उत्पन्न जमा केले, याचा हिशेब उपलब्ध होईल. तिकीट विक्रीतून अपेक्षित असलेली रक्कम यामधील तफावतही समोर येणार आहे. शहरातील ४२ ई-बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन, वेळापत्रक तयार करणे, चालक-वाहकांच्या ड्युटीचे नियोजन खडकी बस डेपोतील इंटिग्रेटेड ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टिममधून केले जाणार आहे. यंत्रणेच्या कामकाजावर महापालिकेचे नियंत्रण राहणार आहे.