![]()
भारतीय जनता पक्षाचे प्रवीण पोटे यांनी अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅटट्रिक साधली आहे. सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. पोटे यांना ३९० मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना ३१ मते मिळाली. विशेष म्हणजे, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख यांना एकही मत मिळाले नाही. या मतदारसंघात एकूण ४५३ मतदार होते. धारणी आणि दर्यापूर येथील प्रत्येकी एका नगरसेवकाच्या निधनामुळे ४५१ नगरसेवक मतदानासाठी पात्र होते. १८ जून रोजी झालेल्या मतदानात २६ जणांनी भाग घेतला नाही. उर्वरित ४२७ मतांपैकी ६ मते अवैध ठरवण्यात आली, तर ४२१ मते वैध होती. विजयासाठी प्रथम पसंतीची २११ मते आवश्यक होती, परंतु पोटे यांना त्यापेक्षा कितीतरी अधिक मते मिळाल्याने त्यांना पहिल्या फेरीतच विजयी घोषित करण्यात आले. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ही माहिती भारत निवडणूक आयोगाला कळवली. त्यानंतर साधारणतः एका तासाने प्रवीण पोटे यांच्या विजयाची घोषणा करून त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक तथा कामगार आयुक्त डॉ. ह. पि. तुम्मोड, विभागीय आयुक्त नयना गुंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, सहायक निवडणूक अधिकारी संतोष काकडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. पक्षीय बलाबलानुसार, भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक १५० मतदार होते. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे ३३, युवा स्वाभिमानचे २६, प्रहारचे २१, शिंदेसेनेचे १८ आणि बसपचे ३ असे मिळून महायुतीची एकूण संख्या २५१ होती. प्रवीण पोटे यांना तब्बल ३९० मते मिळाल्याने त्यांनी महायुतीव्यतिरिक्त इतर पक्षांची १४० मते आपल्याकडे खेचल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे, जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेसचे १२०, उद्धवसेनेचे २१ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ११ असे मिळून महाविकास आघाडीचा आकडा १५२ होता. मात्र, महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे हर्षजीत देशमुख यांना यापैकी एकाही मतदाराने मतदान केले नाही. याशिवाय एमआयएमचे १६, सपाचे २ आणि २५ अपक्ष असे एकूण ४३ मतदार होते. यापैकी बहुसंख्य नगरसेवकांनीही महायुतीच्या उमेदवारालाच कौल दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
Source link
प्रवीण पोटे तिसऱ्यांदा विधान परिषदेवर विजयी:अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 390 मते मिळवत हॅटट्रिक