![]()
पैठण तालुक्यातील पाचोड येथील पैठण चौकात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण म्हणून पाचोडची ओळख आहे. मात्र, पैठण चौकातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत असून, या समस्येकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. पैठणच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना पैठण चौकातून बीडच्या दिशेने अथवा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने वळण घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. चौकातील रस्त्याची अपुरी रचना आणि वाढलेली वाहनांची संख्या यामुळे मोठ्या वाहनांना वळण घेताना प्रचंड अडचणी निर्माण होतात. अनेकदा मोठी वाहने वळण घेत असताना रस्त्यावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प होते; परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पाचोड परिसरातील जवळपास ४० ते ५० गावांतील नागरिकांचा दररोज या चौकातून वावर असतो. बाजारपेठ, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था तसेच विविध व्यवसायांच्या निमित्ताने नागरिक पाचोड येथे येतात. त्यातच धुळे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असल्याने पैठण चौकात वाहतुकीचा ताण सतत वाढत आहे. पाचोड बसस्थानक परिसरातही वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने प्रवासी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना अडचणींचा सामना करावा लागतो. या कोंडीमुळे नागरिकांचा मौल्यवान वेळ रस्त्यावर अडकून राहण्यात वाया जातो. रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही या समस्येचा फटका बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचणे अवघड होते. पाचोड येथील पैठण चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होत असून, वाहनधारक त्रस्त आहेत. छाया ः इरफान शेख मोठ्या ट्रेलरमुळे २० मिनिटे वाहतूक ठप्प रविवारी दुपारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड येथील पैठण चौकात एका मोठ्या ट्रेलरला वळण घेताना अडथळा निर्माण झाल्याने तब्बल २० मिनिटे वाहतूक कोंडी झाली. पैठणच्या दिशेने येणारा हा ट्रेलर चौकातून वळताना अपुरी जागा आणि प्रचंड वर्दळ यामुळे चालकाची मोठी कसरत झाली. या कोंडीचा फटका एका रुग्णवाहिकेलाही बसला. रुग्णवाहिका काही काळ या रांगेत अडकून पडल्याने रुग्णाच्या नातेवाइकांत चिंतेचे वातावरण पसरले होते. चौकातील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त Ãया चौकात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियमितपणे बंदोबस्त तैनात करण्यात येतो. मात्र, चौकातील जागा अपुरी असल्याने मोठ्या वाहनांची गर्दी झाली की काही काळ अडथळा निर्माण होतो. रविवारी झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी तात्काळ सुरळीत केली आहे. – सचिन पंडित, सहाय्यक पोलिस निरीक्षक पाचोडमधील पैठण चौकाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार; लवकरच काम पाचोडमधील पैठण चौक हा अत्यंत महत्त्वाचा चौक आहे. या चौकाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून येत्या काही कालावधीत हे काम पूर्ण केले जाईल. दरम्यान, सध्या वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने तिथे कर्मचारी तैनात करावेत, असे पत्र देण्यात आले असल्याचे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले. तसेच वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढत असून व्यापारी आणि नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. पैठण चौकातील समस्या सोडवण्यासाठी सुयोग्य वाहतूक नियोजन, दिशादर्शक फलक, रस्त्याची सुधारणा आणि वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती करण्याची मागणी होत आहे. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Source link
प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी:पाचोडच्या पैठण चौकामध्ये वाहतूककोंडीचा विळखा; वाहनधारक त्रस्त, वळण घेण्यासाठी वाहनचालकांची होेतेय कसरत