![]()
सर्वोपचार रुग्णालयात शनिवारी (दि. 21) वॉर्ड क्रमांक 32 मधील मेडिसिन विभागात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाने दोन इंटर्न डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली. निहार लाडे आणि लासी कुमारी अशी मारहाण झालेल्या इंटर्न डॉक्टरांची नावे आहेत. उपचारासाठी संबंधित रुग्णाजवळ गेलेल्या डॉक्टरांवर रुग्णाने अचानक हाताने आणि बुक्क्यांनी हल्ला चढवला. या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात खळबळ उडाली असून, डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. वॉर्ड क्रमांक 32 मधील मेडिसिन विभागात संबंधित रुग्ण उपचारासाठी दाखल होता. त्याच्याजवळ उपचारासाठी गेलेल्या निहार लाडे व लासी कुमारी या दोन इंटर्न डॉक्टरांवर रुग्णाने अचानक हल्ला केला. हाताने आणि बुक्क्यांनी मारहाण करीत तो दोन्ही डॉक्टरांच्या अंगावर धावून गेला. हा प्रकार सुरू असताना काही वेळाने ‘मेस्को’चे सुरक्षारक्षक घटनास्थळी पोहोचले. घटनेनंतर संतप्त झालेल्या डॉक्टरांनी थेट अधिष्ठात्यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली; मात्र तेथेही आपल्याला मदत मिळाली नाही, असा आरोप संबंधित डॉक्टरांनी केला आहे. या घटनेची माहिती डॉक्टरांनी ‘असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स, महाराष्ट्र’ या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही दिली आहे. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या घटनांनंतरही डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना का होत नाहीत, असा सवाल डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद ही घटना वॉर्डमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अशा घटनांमुळे डॉक्टरांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते आणि त्याचा रुग्णसेवेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. डॉक्टरांकडून आंदोलनाचा इशारा? या प्रकरणी कारवाई न झाल्यास बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. रुग्णालयात रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळणे अत्यावश्यक आहे. आता रुग्णालय प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मारहाण:डॉक्टरांवर रुग्णाने चढवला अचानक हल्ला, रुग्णालय परिसरात उडाली खळबळ