![]()
तालुक्यात यावर्षी प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड करण्याचा ठाम निर्णय शेतकरी संघटनेने घेतला असून, या संदर्भात शुक्रवारी १७ रोजी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
.
शेतकरी संघटनेच्या मते, एचटीबीटी बियाणे तणनाशक सहनशील असल्यामुळे शेतीतील उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. सध्या मजुरांची टंचाई, वाढते फवारणी व खतांचे दर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत एचटीबीटी बियाण्यांमुळे अतिरिक्त खर्चावर नियंत्रण मिळवता येईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा दावा संघटनेने केला आहे. सोबतच शासनाने या बियाण्यांवर बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकार परदेशातून एचटीबीटी संबंधित सोयाबीन, सोयाबीन तेल आणि पेंड आयात करत असताना देशातील शेतकऱ्यांना त्याच बियाण्यांची लागवड करण्यास बंदी घालणे हे दुटप्पी धोरण असल्याचा आरोपही करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर, शेतकरी संघटनेने जाहीरपणे एचटीबीटी बियाण्यांची लागवड करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, सरकारने शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव गावंडे, अंजनगाव तालुका अध्यक्ष संजय हाडोळे, स्वतंत्र भारत पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन दुधाट, जिल्हा समन्वयक मनोहर रेचे, सुनील साबळे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास ढोक, अशोक गीते, मोहन ठाकरे, संजय हिंगे, बाबूराव साबळे, अरुण गोंडचोर, मधुकर मोरे, ज्ञानेश्वर वानखडे, प्रभाकर डोंबाळे, विनोद चिंचोळकर, विलास धुमाळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.