![]()
शहरातील मोर्शी ते सिंभोरा रोडलगत असलेल्या बालाजी नगरातील खुल्या जागेवर नमो उद्यान साकारण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. संतप्त नागरिकांच्या वतीने शेकडो सह्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनाची प्रतिलिपी आ. चंदू यावलकर यांना देण्यात आली. शहर विकासाच्या दृष्टीने नमो गार्डनचे एक मॉडेल तयार करण्यात आले आहे. हे मॉडेल भव्य-दिव्य परिसर असलेल्या बालाजी नगर येथील शिवपार्वती मंदिरासमोर, मोर्शी ते सिंभोरा रोडलगत असलेल्या जागेवर साकारण्यात यावे, असा मानस तेथील नागरिकांनी आ. यावलकर यांच्याकडे व्यक्त केला. आता निवडणुकीदरम्यान सत्ता स्थापन झाल्यानंतर नगरपरिषदेच्या वतीने हे नमो उद्यान बालाजी नगरऐवजी शहरातील मालवीय गार्डन येथे स्थानांतरित करण्याचा घाट घातला आहे. याला नागरिकांचा विरोध आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या मालवीय नगरातील उद्यानाची पूर्णपणे दुरुस्ती करण्यासाठी नगरपरिषदेने ठराव घेऊन १ कोटीच्या निधीचे इस्टिमेट तयार केले. बालाजी नगर येथे होणाऱ्या नमो उद्यानाचा निधी मालवीय गार्डन येथे तयार असलेल्या उद्यानावर खर्च केला जात असल्याची माहिती बालाजी नगर येथील नागरिकांना मिळाली. त्यांनी संबंधित नगरसेवकांकडे धाव घेऊन नमो उद्यानाची निर्मिती शिवपार्वती मंदिरासमोरील खुल्या जागेवरच व्हावी, अशी मागणी रेटून धरली. या प्रकल्पासाठी सुमारे ९९ लाख ९९ हजार ८९९ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र मालवीय गार्डन येथील उद्यानात जॉगिंग ट्रॅक, गार्डन, बेंचेस, वृक्षारोपण, लाईट व सोलर लाईट यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तरीदेखील याच कामांसाठी पुन्हा खर्च दाखविण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी आर्थिक अनियमिततेचा संशय व्यक्त केला आहे. बालाजी नगर येथील शिवपार्वती मंदिरासमोर असलेल्या ओपन प्लेसमध्येच नमो उद्यानाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका प्रीती देशमुख यांनी केली आहे. नमो उद्यान हे नवीन जागेवरच विकसित करण्यात यावे, असा शासनाचा जीआर आहे. त्या अनुषंगाने बालाजी नगर येथील शिवपार्वती मंदिरासमोर असलेला खुला परिसर निश्चित करण्यात आला होता, अशी माहिती आ. चंदू यावलकर यांनी दिली.
Source link
नमो उद्यान प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात:संतप्त नागरिकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना स्वाक्षऱ्यांचे निवेदन, चौकशीची मागणी