Headlines

राज्यात उष्णतेचा कहर अन् अवकाळीचा तडाखा:एकीकडे कडक उन्हाळा, दुसरीकडे विजांसह पाऊस; शेतकऱ्यांची वाढली चिंता




राज्यात सध्या हवामानाचा विलक्षण आणि चिंताजनक बदल पाहायला मिळत आहे. एका बाजूला तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून अनेक ठिकाणी तो 40 अंशांच्या पुढे गेला आहे, तर दुसऱ्या बाजूला काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या दुहेरी परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांसह विशेषतः शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत होत असतानाच अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती वाढली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर अधिकच तीव्र झाला आहे. अकोला येथे 44.1 अंश तापमानाची नोंद झाली असून, वर्धा 44.4, नागपूर 44, गडचिरोली 44 आणि अमरावतीतही 44 अंशांच्या आसपास तापमान पोहोचलं आहे. यवतमाळमध्ये 42.8, चंद्रपूर 43.6, गोंदिया 42.9 आणि भंडारा 42 अंशांवर पोहोचले आहे. या तीव्र उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताचा धोका वाढला आहे. राज्यातील इतर भागांमध्येही तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. सांगलीमध्ये 41.5, जळगाव 42.3, परभणी 41.8, सातारा 40.8, पुणे 40.3 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 41.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये 38.4, ठाणे 37 आणि माथेरानमध्ये 36 अंश तापमान आहे. या वाढत्या उष्णतेचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे जाणवू लागला असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. दरम्यान, उष्णतेच्या या लाटेसोबतच राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात सुमारे 1 तास पाऊस कोसळला. शहरातही अचानक पावसाची सर आली. काही दिवसांच्या तीव्र उकाड्यानंतर पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी शेती पिकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. वीज कोसळून तरुणाचा मृत्यू या अवकाळी पावसादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. मोहोळ तालुक्यातील आढेगाव येथे वीज कोसळून विजय राजाराम डोंगरे या तरुणाचा मृत्यू झाला. बांधकामासाठी आलेल्या वाळूच्या ट्रकजवळ असताना अचानक वातावरण बदलले आणि विजेचा कडकडाट सुरू झाला. त्याचवेळी वीज कोसळून तो गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उष्णता आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातही उष्णतेचा तडाखा वाढला असून तापमान 41 अंशांवर पोहोचले आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरावरही दिसून येत आहे. भाविकांची संख्या कमी झाली असून संस्थानने भाविकांसाठी मंडप, गालिचे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. एकूणच, राज्यात उष्णता आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसत असल्याने शेतकरी आणि नागरिक दोघेही मोठ्या चिंतेत सापडले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *