![]()
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. हे पाशवी कृत्य केल्यानंतर आरोपी गावकऱ्यांमध्ये मिसळून मुलीला शोधण्याचे नाटक करत होता. मात्र, सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहताना त्याने मारलेली ‘बघा बघा, मी सीसीटीव्हीत दिसतोय’ ही अतिशहाणपणाची बढाईच त्याच्या अंगलट आली आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे या नराधमाच्या मुसक्या आवळल्या गेल्या. काय आहे नेमकी घटना? साहिल खैरे असे या नराधम आरोपीचे नाव असून, तो कामानिमित्त पिंपळवंडीत त्याच्या बहिणीच्या घरी आला होता. बहिणीच्या घराजवळच राहणाऱ्या एका कुटुंबातील चिमुकलीसोबत त्याची ओळख झाली होती. पीडित मुलगी कांजण्या आल्यामुळे शाळेत गेली नव्हती आणि ती घरी एकटीच होती. तिचे आई-वडील शेतात मजुरीसाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत, या नराधमाने चिमुरडीला ‘सायकल शिकवण्याचा’ बहाणा केला. घरापासून दीड किलोमीटर अंतरावर त्याने सायकल उभी केली आणि तिला एका निर्जन उसाच्या शेतात (जिथे घनदाट शेती आणि ओढा आहे) नेले. तिथे त्याने चिमुकलीवर अत्याचार केले आणि नंतर तिची निर्घृण हत्या केली. आई-वडील घरी आल्यावर मुलगी न दिसल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. गावकऱ्यांसोबत शोधाशोध आणि सीसीटीव्ही तपासणी मुलगी बेपत्ता असल्यामुळे गावात लोक जमा झाले होते. आरोपी साहिल खैरे याच्या चेहऱ्यावर गुन्ह्याचा कोणताही पश्चात्ताप नव्हता. तो गावकऱ्यांसोबत मिळून मुलीला शोधण्याचे नाटक करत होता. दुपारी साडेचार वाजता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी साडेपाचच्या सुमारास गावातील एका घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी सर्व गावकरी आणि हा नराधमही स्टूलवर बसून पोलिसांसोबत ते फुटेज पाहत होता. ‘तो’ एक क्लू आणि नराधम अडकला जाळ्यात! सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती सायकलवरून जाताना दिसली. ते पाहताच गर्दीत बसलेला आरोपी साहिल ऐटीत म्हणाला, “बघा, बघा… मी सायकलवरून चाललोय!” त्याने स्वतःहून दाखवलेला हा अतिशहाणपणा पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांना तपासाचा पहिला मोठा क्लू मिळाला. यानंतर पोलिसांनी दुसऱ्या एका ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात तीच सायकल वेगाने डावीकडे वळताना दिसली. अंतर जास्त असल्याने चेहरा अस्पष्ट होता, पण पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने सायकल आणि त्यावरील व्यक्तीची शरीरयष्टी मघाशी बोलणाऱ्या साहिलशी मिळतीजुळती असल्याचे हेरले. पोलिसी खाक्या आणि गुन्ह्याची कबुली संशय बळावल्याने पोलिसांनी तातडीने साहिलला गाडीत टाकले आणि त्याची उलटतपासणी सुरू केली. त्याने “मी सायकलवरून मळ्यात गेलो होतो,” अशी थाप मारली. मात्र, गावातील एका व्यक्तीने लगेच निदर्शनास आणून दिले की, जर तो मळ्यात गेला असता तर दुसऱ्या एका कॅमेऱ्यात नक्कीच दिसला असता; पण तो तसा दिसलाच नाही! या विसंगतीनंतर पोलिसांनी त्याला आपला ‘खाक्या’ दाखवला. पोलिसी हिसका बसताच साहिलने अखेर आपला गुन्हा कबूल केला. त्यानेच पोलिसांना घटनास्थळी नेले, जिथे गुऱ्हाळाशेजारील तागाच्या शेताजवळील एका पाईपखाली त्याने चिमुकलीचा मृतदेह लपवून ठेवला होता. पोलिस आणि गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि आरोपीच्या स्वतःच्या एका चुकीमुळे अवघ्या काही तासांतच या विकृत नराधमाचे बिंग फुटले. या भयंकर घटनेमुळे जुन्नर आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याच संदर्भातील ही देखील बातमी वाचा जुन्नर हादरले:चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात, नराधमाला फाशीच द्या- ग्रामस्थ जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. इथे सविस्तर बातमी वाचा
Source link
‘बघा बघा, मी CCTV मध्ये दिसतोय…’:चिमुरडीवर अत्याचार करून गावकऱ्यांसोबतच शोध घेत बसला, एका वाक्याने नराधमाचे फुटले बिंग