Headlines

मृत्यूच्या दाढेतून परतला!:बोअरवेलमध्ये अडकलेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याची सुखरूप सुटका; जिंतूरमधील कौसडी येथील थरार




जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारात बुधवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. शेतात खेळत असताना एक तीन वर्षांचा चिमुकला अचानक उघड्या बोअरवेलमध्ये पडला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आधियान शेख नदीम (वय 3 वर्षे, रा. कौसडी, ता. जिंतूर) असे या बोअरवेलमध्ये पडलेल्या बालकाचे नाव आहे. बुधवारी तो आपल्या वडिलांसोबत शेतात गेला होता. त्याचे वडील शेतीच्या कामात व्यस्त असताना, खेळता खेळता आधियान उघड्या असलेल्या तब्बल 200 फूट खोल बोअरवेलमध्ये कोसळला. तो सुमारे 15 फूट खोल असलेल्या केसिंग पाईपमध्ये जाऊन अडकला होता. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू बालक बोअरवेलमध्ये पडल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. तात्काळ दोन जेसीबी मशीन मागवून खोदकाम सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बोरी पोलिस ठाण्याचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती हाताळण्यासाठी आणि रेस्क्यू ऑपरेशन वेगाने करण्यासाठी नांदेड येथील आपत्ती व्यवस्थापन पथकालाही तातडीने पाचारण करण्यात आले होते. अखेर चार तासांनी सुटकेचा निश्वास आपला लाडका चिमुकला सुखरूप बाहेर यावा यासाठी संपूर्ण गाव प्रार्थना करत होते आणि सर्वांचे डोळे बचावकार्याकडे लागले होते. दरम्यान, प्रशासनाचे आणि ग्रामस्थांचे प्रयत्न फळाला आले. तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आधियानला बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. आपल्या काळजाच्या तुकड्याला सुखरूप पाहताच पालकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. चिमुकल्याची सुटका झाल्याने उपस्थित ग्रामस्थ आणि प्रशासनानेही मोठा सुटकेचा निश्वास सोडला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *