![]()
वंचित बहुजन आघाडी दिंडोरी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बहुजन हक्क निर्धार परिषद शुक्रवारी (दि. १५) येथील खुशी बँक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडली. यावेळी बोलताना वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. शिक्षण क्षेत्रातील वाढते खासगीकरण हा गरिबांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न असून सरकारने शिक्षण भांडवलदारांच्या दावणीला बांधल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. परिषदेत सामाजिक न्याय, संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि संघटनात्मक बांधणी या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सुजात आंबेडकर यांनी शिक्षण हा सर्वसामान्यांचा मूलभूत अधिकार आहे. बहुजन समाजाने आता संघटित होऊन आपली सामाजिक व राजकीय ताकद वाढवण्याची गरज आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर संघटन मजबूत करून संविधानिक मूल्यांवर आधारित नवे राजकारण उभे करावे. राज्य प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांनी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक विषमता या मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. सरकारची धोरणे आदिवासी, मुस्लिम, बौद्ध आणि ओबीसी समाजासाठी घातक ठरत असून महिलांनी या राजकीय चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी स्थानिक प्रश्नांवर भाष्य करताना प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेजवळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत अहिरे, युवा महासचिव विकी दुर्धवळे, शहराध्यक्ष तुषार मोरे, उपाध्यक्ष संकेत गांगुर्डे आदींनी परिश्रम घेतले. युवा आघाडीचे जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे यांनी परिषदेची भूमिका स्पष्ट करत सामाजिक न्यायाची लढाई अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Source link
बहुजन हक्क परिषद:शिक्षण भांडवलदारांच्या दावणीला, वणीमध्ये सुजात आंबेडकरांचा सरकारवर घणाघात