![]()
येथील पुतळा पार्क परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागी आता भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. बार्शी नगर परिषदेच्या शुक्रवारी (दि. १०) झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी मुख्याधिकारी तैमुर मुलाणी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. दिवाणी न्यायालयासमोर असलेल्या पुतळा पार्क येथील हा नवीन पूर्णाकृती पुतळा आवश्यक त्या सर्व शासन परवानग्या घेऊन लवकरच उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे, राज-विजय क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने स्वखर्चातून हा पुतळा उभारून त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली. या निर्णयाचे स्वागत करत प्रेक्षक गॅलरीतील आंबेडकर प्रेमी नागरिकांनी नगरसेवकांवर पुष्पवृष्टी करून घोषणाबाजी केली. विरोधकांचे आरोप फेटाळताना ज्येष्ठ नगरसेवक विजय राऊत म्हणाले की, शहराचा समतोल विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. गेल्या काळात सर्व प्रभागांत कोट्यवधींची कामे झाली असून, आगामी काळातही ती सुरूच राहतील. दरम्यान, नगरसेविका विद्या बंगाळे व सरस्वती भानवसे यांनी कचरा डेपोच्या खर्चावरून प्रशासनाला धारेवर धरले. जुन्या खर्चाचा तपशील न देता नवीन खर्च करण्याला बंगाळे यांनी आक्षेप घेत उपोषणाचा इशारा दिला. सभेतील चर्चेत उपनगराध्यक्ष रोहित पाटील, संदेश काकडे, अमोल चव्हाण, भारत पवार, नवनाथ माळगे, क्षमा रिकीबे, चांगुना जाधव आदींंनी यावेळी सहभाग नोंदवला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा. सत्ताधारी विरोधकांत खडाजंगी सभेत एकूण २५ विषयांवर चर्चा झाली. मात्र, पुतळ्याचा विषय वगळता अन्य मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी लातूर रोड परिसरात वारंवार निधी खर्च होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर पक्षपातीपणाचा आरोप केला. विकासकामांबाबत प्रशासन व नगराध्यक्ष दुर्लक्ष करत असून, वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांकडे धाव घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच सभागृहातील चर्चेचे प्रोसिडिंग होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रश्न मार्गी लावणे गरजेचे ^”सर्व महापुरुषांचे पुतळे उभारण्यास सभागृहाने पूर्वीच मंजुरी दिली आहे. संकेश्वर उद्यानात पुतळ्यांसाठी चबुतरा उभारण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने या कामाची गती वाढवून रखडलेले सर्व पुतळे लवकरात लवकर मार्गी लावणे गरजेचे आहे.” नागेश अक्कलकोटे, विरोधी पक्षनेते बार्शी नगर परिषद
Source link
बार्शीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास मंजुरी:विरोधकांचे पक्षपातीपणाचे आरोप, सत्ताधाऱ्यांकडून कामांचे समर्थन