![]()
बागलाण तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांत दोन महिलांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मृतांच्या वारसांना केंद्र शासनाच्या माध्यमातून २५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी दिली. भविष्यात अशा घटनांमध्ये जीवितहानी होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अजमेर सौंदाणे येथील अक्काबाई माळी व ठेंगोडा येथील बेबीबाई बोरकर यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आठवडाभरापासून तालुक्यात विविध ठिकाणी बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार बच्छाव यांनी सटाणा येथे वनपरिक्षेत्राधिकारी सोमनाथ आमले यांच्यासह वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत वन विभागाकडून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी ठेंगोडा परिसरात वीज खंडित न करण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. रात्री सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवण्याबाबतही संबंधित यंत्रणेने योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
Source link
बिबट्याच्या हल्ल्यात मृतांच्या वारसांना 25 लाखांची मदत मिळवून देणार:खासदार डॉ. शोभा बच्छाव यांची ग्वाही