Headlines

बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू:शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे पहाटेची घटना




शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे गोठ्यात झोपलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २२ जुलै) पहाटे घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा मृत्यू झाला. भाग्यश्री संदीप वारे (वय ५, मूळ रा. करोडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर; सध्या रा. पिंपळसुटी, ता. शिरूर) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. पोलिसांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, भाग्यश्रीचे कुटुंबीय पिंपळसुटी येथील मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या गोठ्यात झोपले होते. बुधवारी पहाटे सुमारे २ वाजून ४० मिनिटांनी अचानक आवाज आल्याने भाग्यश्रीचे चुलते बाबासाहेब कोंडीबा वारे जागे झाले. त्या वेळी बिबट्या भाग्यश्रीला उचलून घेऊन जात असल्याचे त्यांना दिसले. कुटुंबीयांनी तत्काळ आरडाओरडा केला. मात्र, बिबट्याने भाग्यश्रीला घेऊन जवळील गणेश सोनवणे यांच्या उसाच्या शेतात प्रवेश केला. घटनेची माहिती शेतमालक भोसले यांना देण्यात आली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थांना घटनास्थळी बोलावण्यात आले. वन विभागाचे कर्मचारी, कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी उसाच्या शेतात शोधमोहीम राबविली. काही वेळाने भाग्यश्री गंभीर अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने रुग्णवाहिकेतून न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे पिंपळसुटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. पुढील तपास शिरूर पोलिस करीत आहेत. हेही वाचा.. पुण्यात अपघात:कात्रज बोगद्याजवळ भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना जुन्या कात्रज बोगदा परिसरात घडली. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *