![]()
वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे, मात्र अत्यंत खरमरीत शब्दांत निशाणा साधला आहे. सानपाडा येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिंदेंच्या कार्यपद्धतीवर, विशेषत: क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीवर कडक शब्दांत टीका केली. “बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला आहे,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे महायुतीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. काय म्हणाले गणेश नाईक? नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील पुनर्विकासाच्या मुद्द्यावर बोलताना गणेश नाईक आक्रमक झाले होते. ते म्हणाले, “कॉलनीमध्ये 20 वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांची पुनर्बांधणी ही साध्या पुनर्विकासाऐवजी जर क्लस्टर योजनेतून होत असेल, तर ते या शहरासाठी फार घातक आहे. कॉलनी भागातील इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना लागू करणे, हे सरळसरळ बिल्डरांच्या घशात पैसे घालण्यासारखे आहे.” थेट इशारा “स्वतःच्या फायद्यासाठी यांनी बिल्डरांच्या नादी लागून महाराष्ट्र दहा वर्षे मागे नेला आहे. जर कोणी असा प्रयत्न केला, तर त्यांच्या घशातून पैसे काढण्यात येतील. आम्हाला बुद्धू समजून कुणी टपली मारणार असेल, तर त्याचा हात धरून त्याची लायकी दाखवण्याची ताकद माझ्यात आहे. जनतेला गृहीत धरून कोणी नाटक करणार असेल, तर त्या नाटकाचा तमाशा कसा करायचा, हे गणेश नाईक दाखवून देईल.” आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका गणेश नाईक यांच्या या वक्तव्याचा आधार घेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “मंत्र्यांकडे (गणेश नाईक) खूप डेटा येत असतो, त्यामुळे ते जे बोलत आहेत, ते कदाचित खरेही असू शकते. एकनाथ शिंदेंनी दहा वर्षांत काय, तर कितीतरी शेकडो वर्षे माणुसकीला मागे नेलेले आहे. जेव्हा केव्हा त्यांच्यावर केस लागण्याची शक्यता असते, तेव्हा ते दरेगावला का पळतात? याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा.” गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा पलटवार गणेश नाईकांच्या या जहरी टीकेनंतर महायुतीतील शिंदे गटाचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. “गणेश नाईक यांनी आता हे थांबवले पाहिजे. आपण महायुतीमध्ये एकत्र काम करत आहोत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षे समर्थपणे काम केले आहे. जर शिंदेंनी तो उठाव केला नसता, तर आज गणेश नाईक साहेब मंत्री देखील झाले नसते, याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी.” वरिष्ठांकडे गाऱ्हाणे मांडा “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात अत्यंत चांगले संबंध आहेत. महायुतीमध्ये कुठेही कटुता येऊ नये, याची जबाबदारी नाईकांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली पाहिजे. त्यांच्या मनात जी काही खदखद असेल, ती त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे मांडावी आणि तो विषय कायमस्वरूपी संपवावा, अशी माझी त्यांना विनंती आहे.” महायुतीतील मतभेद पुन्हा चर्चेत गणेश नाईक यांच्या ‘बिल्डरांच्या नादी लागून महाराष्ट्र १० वर्षे मागे नेला’ या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आलं आहे. नाईक यांनी थेट एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं नसलं, तरी योगेश कदम यांनी शिंदेंची बाजू घेत नाईकांना सुनावल्याने या वक्तव्याचा राजकीय रोख स्पष्ट झाला आहे. एकीकडे गणेश नाईक यांची नाराजी, दुसरीकडे योगेश कदमांचा पलटवार आणि त्यात आदित्य ठाकरे यांनी साधलेला निशाणा यामुळे पुनर्विकास आणि क्लस्टर योजनेच्या मुद्द्याला आता राजकीय रंग चढला आहे. महायुतीतील वरिष्ठ नेते या वादावर कशी भूमिका घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. हेही वाचा… बीडमध्ये एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही: मनोज जरांगे पाटलांचा दावा तथ्यहीन, महसूल विभागाचा खुलासा बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून रद्द करण्यात आलेले नाही. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विविध वृत्तवाहिन्यांवर केलेले दावे पूर्णपणे तथ्यहीन आणि वस्तुस्थितीला धरून नाहीत, असा स्पष्ट आणि अधिकृत खुलासा बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाला सादर केलेल्या चौकशी अहवालात केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
बिल्डरांच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला:गणेश नाईक यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल; क्लस्टर योजनेला विरोध