![]()
शेतीतील नुकसान, सततची नापिकी आणि डोक्यावर वाढत जाणारे कर्ज यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर येथे शंकर रामभाऊ भारसाकळे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत कर्ज फेडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. स्वतःची जमीन विकली, एक वावर गहाण ठेवले, पत्नीची पोतही गहाण ठेवली; मात्र तरीही कर्ज फिटले नसल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. जमीन विकली, पत्नीची पोत गहाण ठेवली; तरी कर्जाचा प्रश्न कायम मिळालेल्या माहितीनुसार, शंकर भारसाकळे हे अल्पभूधारक शेतकरी होते. शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि वाढता खर्च यांचा मेळ बसत नसल्याने त्यांच्यावर कर्जाचा मोठा भार निर्माण झाला होता. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्जाची परतफेड करणेही कठीण झाले होते. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मालकीची जमीन विकली. त्यानंतर उरलेली जमीनही गहाण ठेवली. एवढेच नव्हे, तर आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पत्नीची पोतदेखील गहाण ठेवली. मात्र, एवढे प्रयत्न करूनही कर्जाचा प्रश्न सुटला नाही. आर्थिक विवंचना आणि वाढत्या कर्जामुळे ते अडचणीत सापडले होते. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मांडली व्यथा जीवन संपवण्यापूर्वी शंकर भारसाकळे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत त्यांनी आपल्यावरील कर्जाचा उल्लेख करत कर्ज फेडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. चिठ्ठीत त्यांनी लिहिले आहे, “माझ्यावर खूप कर्ज आहे. वावर विकून पण कर्ज फिटलं नाही. एक वावर गहाण ठेवून बी फिटलं नाही. बायकोची पोत गहाण ठेवून पण पाहिजे तितके पैसे भेटले नाही, म्हणून मी आता जीवन संपवत आहे.” या काही ओळींतून कर्जाचा भार कमी करण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले होते, हे समोर येते. कर्ज फेडण्यासाठी शेती आणि कुटुंबाच्या मौल्यवान वस्तू गहाण ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. मात्र, परिस्थितीत सुधारणा न झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मंत्री बावनकुळे गावात पोहोचण्यापूर्वीच घटना दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणार होते. मात्र, ते चोंडी टाकळेश्वर येथे पोहोचण्यापूर्वीच शंकर भारसाकळे यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. मंत्र्यांचा दौरा आणि शेतकऱ्याच्या आत्महत्येची घटना एकाच दिवशी घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुष्काळी परिस्थितीची पाहणी आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असतानाच ही घटना समोर आली आहे. दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष बुलढाणा जिल्ह्यातील या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज, पिकांचे नुकसान, उत्पादनातून मिळणारे कमी उत्पन्न आणि कर्जफेडीचा वाढता ताण यामुळे अनेक शेतकरी संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत, पीक नुकसान भरपाई आणि आवश्यक शासकीय योजनांचा लाभ मिळणे महत्त्वाचे ठरते. शंकर भारसाकळे यांच्या मृत्यूमुळे चोंडी टाकळेश्वर गावावर शोककळा पसरली आहे. एका शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी जमीन विकण्यापासून पत्नीची पोत गहाण ठेवण्यापर्यंत प्रयत्न केले, तरीही त्यांच्यावरील आर्थिक संकट दूर झाले नाही. या घटनेनंतर संबंधित कुटुंबाला शासकीय मदत मिळावी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे. हेही वाचा… CJP च्या मुंबईतील आंदोलनात अल्पवयीन मुलांचा ‘ढाल’ म्हणून वापर?:राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल, पोलिस आयुक्तांसह सरकारला नोटीस 2 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईत झालेल्या एका सार्वजनिक आंदोलनात अल्पवयीन मुलांचा कथित सहभाग आणि त्यानंतर त्यांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याबाबतच्या तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) ‘मानवाधिकार संरक्षण कायदा, 1993’ च्या कलम 12 अन्वये दखल घेतली आहे. NHRC चे सदस्य प्रियंक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर विचार केला. ही तक्रार ‘सेवा न्याय उत्थान फाउंडेशन’चे ‘हेड ऑफ इंटरव्हेंशन’ सतीश वैद्य यांनी दाखल केली होती. सविस्तर वाचा…
Source link
बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली:जमीन विकली, पत्नीची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटेना; चिठ्ठी लिहून आत्महत्या