![]()
अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योग आणि नवकल्पनांचा संगम घडविणारे ‘एडब्ल्यूटीआयएस २६’ तंत्रज्ञान व नवकल्पना प्रदर्शन ८, ९ आणि १० ऑक्टोबर २०२६ रोजी हिंजवडी येथील ताज विवांता हॉटेलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीजच्या वतीने होणाऱ्या या प्रदर्शनात विविध तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रकल्प, उत्पादने आणि संशोधनाचे सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती आयोजक मनोहर जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी तसेच जलशक्तिमंत्री सी. आर. पाटील यांच्या विशेष उपस्थितीचे नियोजन असल्याचे जगताप यांनी सांगितले आहे. विविध देशांच्या दूतावासांतील अधिकारी, महाराष्ट्र, गुजरात आणि अन्य राज्यांतील मंत्री तसेच प्रमुख शास्त्रज्ञांनाही सहभागी करण्याचे नियोजन आहे. प्रदर्शनात अर्धसंवाहक व सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, यंत्रमानव व स्वयंचलन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ व उपग्रह तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, विद्युत वाहने, हायड्रोजन, क्वांटम तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रांचा समावेश असेल. डिजिटल पायाभूत सुविधा, डेटा सेंटर्स, माहिती तंत्रज्ञान, कृषी आणि आरोग्य तंत्रज्ञानाशी संबंधित नवकल्पनाही सादर केल्या जाणार आहेत. स्टार्टअप पॅव्हेलियन, संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे दालन आणि उद्योग व शैक्षणिक क्षेत्राचे संयुक्त दालन ही प्रदर्शनाची विशेष आकर्षणे असतील, असे प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे. निवडक उत्पादने आणि तंत्रज्ञानाचे प्रारूपही प्रदर्शित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि उद्योग प्रतिनिधींना तंत्रज्ञानाची कार्यपद्धती प्रत्यक्ष समजून घेण्याची संधी मिळणार आहे. प्रदर्शनाच्या तिन्ही दिवशी तज्ज्ञांची व्याख्याने आणि मार्गदर्शनपर सत्रे होणार आहेत. हरित ऊर्जा, जैवइंधन, हायड्रोजन, वाहन संशोधन, अंतराळ, अर्धसंवाहक आणि सायबर सुरक्षा आदी विषयांवर चर्चा होईल. डॉ. जयंतराज जोशी, डॉ. रमण वेदराजन, संदीप रायरीकर, डॉ. नवल किशोर गुप्ता आणि अच्युत गोडबोले यांच्यासह विविध तज्ज्ञांच्या सहभागाचे नियोजन आयोजकांनी जाहीर केले आहे. मान्यवरांची उपलब्धता आणि मार्गदर्शनानुसार सरकारी करार तसेच भारतातील व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या घोषणा करण्याचा आयोजकांचा मानस आहे. परिषद चार टप्प्यांत होणार असून, दुसरे सत्र १ ते ३ नोव्हेंबरला पुण्यातील जे. डब्ल्यू. मॅरियट येथे, तिसरे १५ ते २० डिसेंबरला दिल्लीतील मानेकशॉ सेंटरमध्ये आणि चौथे जानेवारी २०२७ च्या मध्यावधीत गुजरातमध्ये नियोजित आहे. उद्योग प्रतिनिधी, नवउद्योजक आणि तंत्रज्ञान व्यावसायिकांना संशोधनातील बदल, भविष्यातील संधी आणि सहकार्याच्या शक्यतांवर विचारांची देवाणघेवाण करता येणार आहे. विद्यार्थ्यांना अनुभवी तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन मिळावे, तसेच उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील संवाद वाढावा, हा उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
Source link
पुण्यात 8 ऑक्टोबरपासून ‘एडब्ल्यूटीआयएस’ तंत्रज्ञान प्रदर्शन:संशोधन, उद्योग, नवकल्पनांचा संगम घडवणारे प्रदर्शन; केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार