![]()
“ठाणे हे एकेकाळी सुसंस्कृत लोकांचे, तलावांचे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांचे शहर म्हणून ओळखले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत राजकीय आश्रयाखाली पोसलेल्या गुंडगिरीमुळे ठाण्याची अवस्था बिहारपेक्षा भयंकर आणि ‘गँग्ज ऑफ वासेपूर’सारखी झाली आहे. गेल्या अवघ्या नऊ महिन्यांत शहरात तब्बल 56 खून झाले असून प्रत्येक नाक्यावर आणि शाळा-कॉलेजबाहेर उघडपणे ड्रग्ज विकले जात आहेत. बाळू पूर्णेकर यांच्या हत्येचा खरा सूत्रधार जर या वेळी वाचला, तर पुढच्या दोन महिन्यांत आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याचा बळी जाईल,” असा खळबळजनक आणि घणाघाती आरोप ठाण्यातील विरोधी पक्षांच्या सर्वपक्षीय नेत्यांनी केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांच्या निघृण हत्येच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. या गुन्हेगारीविरोधात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेससह विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाण्याला गुन्हेगारीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी येत्या शुक्रवारी, 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजता ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयावर भव्य ‘भयमुक्त ठाणे जनमोर्चा’ काढण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ठाण्यातला ‘आका’ गुन्हेगारांना वाचवतोय; हा वासेपूरचा रामाधीर कोण? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे मनोज चव्हाण यांनी सत्ताधारी आणि पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे ओढले. “माझ्याकडे थेट व्हिडिओ पुरावा आहे, ज्यामध्ये ठाण्यातील इंदिरानगर भागात तरुण गाडीत बसून उघडपणे ड्रग्ज घेताना दिसतात. हा इंदिरानगर परिसर नेमका कोणाचा मतदारसंघ आहे? माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा! ज्या तरुणाने हा व्हिडिओ काढून पोलिसांत तक्रार केली, त्यालाच आता जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तक्रारदाराला धमकावले जाते आणि नशेड्यांना मोकळे रान दिले जाते, ही कसली कायदा-सुव्यवस्था?” असा सवाल अविनाश जाधव यांनी केला. बीडसारखाच ठाण्यातही एक ‘आका’ “जसा बीडमध्ये गुन्हेगारांना वाचवणारा एक ‘आका’ होता, तसाच ठाण्यातही एक राजकीय आका बसलेला आहे. बाळू पूर्णेकर, जमील शेख यांच्या घरांची अवस्था काय झाली आहे? सत्ताधारी पक्षातील संशयितांची नावे आली की पोलिसांचे हात थरथर कापतात. जर आमच्या बाजूने एखादी किरकोळ घटना घडली असती, तर अर्ध्या तासात आम्हाला लॉकअपमध्ये डांबले असते. पोलीस आयुक्तालयावर काढला जाणारा हा मोर्चा पहिला इशारा असेल; जर गुन्हेगारी थांबली नाही, तर पुढचा मोर्चा थेट या प्रकरणांमागील सूत्रधाराच्या घरावर धडकेल,” असा इशारा जाधव यांनी दिला. वासेपूरचा रामाधीर कोण? काँग्रेस नेते मनोज चव्हाण म्हणाले, “निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही गुंडांचा वापर करता आणि मग सत्तेत आल्यावर पाच वर्षे त्या गुंडांचे गुन्हे झाकण्याचे काम करता. माझे कुटुंब आज भीतीखाली जगत आहे. ठाणे जर वासेपूर झाले असेल, तर या वासेपूरचा ‘रामाधीर सिंग’ कोण आहे, हे आता जनतेला शोधून काढावे लागेल.” धर्मवीरांचे ठाणे लुटारूंच्या हाती; पालकमंत्री कुठे झोपलेत? -राजन विचारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते तथा माजी खासदार राजन विचारे यांनी ठाण्याच्या दुर्दशेवर संताप व्यक्त केला. “धर्मवीर आनंद दिघ्यांच्या ठाण्यात अशी गुन्हेगारी कधीही खपवून घेतली जात नव्हती. आज आठ दिवसांपूर्वी एका पीएसआयच्या डोक्यात मीठ फेकून हत्या केली जाते, पत्रकारांवर हल्ले होतात आणि चार दिवसांपूर्वी आमच्या निष्ठावान बाळू पूर्णेकरांना कार्यालयात घुसून मारले जाते. मारेकऱ्यांना आठ-आठ दिवस पिस्तूल चालवण्याचे ट्रेनिंग दिले जाते आणि आपली पोलीस यंत्रणा काय झोपा काढत होती का?” पालकमंत्र्यांवर थेट निशाणा “पालकमंत्र्यांचे काम जनतेचे रक्षण करणे असते. ठाण्यात दररोज रक्तरंजित घटना घडत असताना पालकमंत्री कुठे झोपले आहेत? ते या पदाला अजिबात लायक नाहीत. नवी मुंबईतून गणेश नाईक, आमदार संजय केळकर, निरंजन डावकरे पूर्णेकरांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करायला येतात, पण जिल्ह्याचे पालक कुठे आहेत? बाळूचा मुलगा मर्चंट नेव्हीत चांगल्या पदावर आहे, तो सुशिक्षित मुलगा डोळ्यांत अश्रू आणून संशयितांची नावे सांगत असताना एफआयआरमध्ये ती नोंदवण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरावे लागते, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते?” केवळ कंत्राटदारी आणि नगरसेवक खरेदी “ठाण्यात विकासाच्या नावाखाली केवळ हजारो कोटींची टेंडर काढायची, आपल्या माणसांना वाटायची आणि त्या पैशांतून आमदार, खासदार, नगरसेवक विकत घ्यायचे, एवढाच धंदा सत्ताधाऱ्यांचा सुरू आहे. एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जायला ठाण्यात दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकावे लागते. या अन्यायाविरोधात पक्ष, जात, धर्म बाजूला ठेवून संपूर्ण ठाणेकरांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे.” 9 महिन्यांत 56 खून; पोलिसांवरचा राजकीय दबाव दूर व्हावा -जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुन्हेगारीच्या अधिकृत आकडेवारीसह सरकारला घेरले. “गेल्या नऊ महिन्यांत एकट्या ठाणे शहरात 56 नागरिकांचे खून झाले आहेत. ही केवळ आकडेवारी नसून कोसळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा जिवंत पुरावा आहे. पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा प्रचंड राजकीय दबाव आहे. आम्हाला पोलिसांवर आणखी ताण आणायचा नाही, पण पूर्णेकर हत्याकांडाची चौकशी पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे.” ड्रग्जमुळे अख्खी पिढी उद्ध्वस्त “मी विधानसभेतही आवाज उठवला होता की, कोठारी कंपाऊंडसारख्या भागात मध्यरात्री दोन वाजता जा, तिथे खुलेआम ड्रग्ज मिळतात. गरीब हॉटेलवाल्यांची दुकाने रात्री साडेबाराला बंद करायला लावणारे पोलीस या ड्रग्ज माफियांवर कारवाई का करत नाहीत? ड्रग्जच्या विळख्यामुळे तरुणांची एक अख्खी पिढी बरबाद होत असून ती गुन्हेगारीकडे वळत आहे. हा प्रश्न केवळ बाळू पूर्णेकरांपुरता मर्यादित नाही, तर ठाण्यातील प्रत्येक सामान्य कुटुंबाच्या मुलाबाळांच्या सुरक्षेचा आहे.” 9 ऑक्टोबरला ‘भयमुक्त ठाणे’ विराट जनमोर्चा पत्रकार परिषदेच्या शेवटी सर्वपक्षीय नेत्यांनी ठाण्यातील सर्व सामाजिक संघटना, वकील बार असोसिएशन, व्यापारी आणि सामान्य नागरिकांना जाहीर आवाहन केले: येत्या शुक्रवारी (9 ऑक्टोबर) संध्याकाळी ठीक 4 वाजता ठाणे शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक रस्त्यावर उतरतील. हा मोर्चा थेट ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयावर धडकणार असून, पूर्णेकर हत्येतील मुख्य सूत्रधारांना अटक करणे, शहरातील ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करणे आणि ठाण्याला गुंडांच्या दहशतीतून मुक्त करण्याची मागणी या मोर्चाद्वारे लावून धरली जाईल.
Source link
9 महिन्यांत 56 खून अन् नाक्यानाक्यांवर ड्रग्ज!:ठाणे आता धर्मवीरांचे राहिले नाही, हे गँग्ज ऑफ वासेपूर झालेय; पूर्णेकर हत्येनंतर भयमुक्त ठाण्यासाठी सर्वपक्षीय वज्रमूठ