![]()
सोनई येथे शुक्रवारी सकाळी भरवस्तीत आणि वर्दळीच्या आंबेडकर चौकात चाकूने वार करून टेम्पो चालकाची हत्या करण्यात आली. रावसाहेब मच्छिंद्र पंडित (वय ३७ , रा. धनगर गल्ली, सोनई) असे मृताचे नाव आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी टेम्पो अडवून पंडित यांना खाली ओढले आणि धारदार चाकूने वार केले. शुक्रवारी सकाळी ११ ते १२ वाजेच्या सुमारास पंडित हे मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोतून जात होते. आंबेडकर चौकात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या टेम्पोसमोर वाहन आडवे लावून त्यांना थांबवले. त्यानंतर खाली ओढून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पंडित यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे आणि पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नयेत. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली असून लवकरच त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी सांगितले. वर्दळीच्या चौकात हत्या, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भरदिवसा आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या आंबेडकर चौकात घडलेल्या या घटनेमुळे सोनईतील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे. हल्लेखोरांनी टेम्पो अडवून चालकावर हल्ला केला आणि पसार झाले. सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींची ओळख पटविणे आणि हत्येमागील कारण उघड करणे हे पोलिसांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.
Source link
भरदिवसा टेम्पो चालकाची चाकूने भोसकून केली हत्या:सोनईतील घटना, दुचाकीवरून आलेल्या दोघांचा हल्ला