![]()
येवदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करतखेड येथे राहणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये मागील काही वर्षांपासून जागेच्या क्षुल्लक कारणावरून वाद सुरू होता. याच वादातून २४ वर्षीय तरुणाने ६० वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर थेट ट्रॅक्टर घालून त्यांना चिरडले. यामध्ये शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी येवदा पोलिसांनी मारेकरी ट्रॅक्टर चालकाला १२ नोव्हेंबरला अटक केली आहे. गजानन रामभाऊ खेडकर (६०, रा. करतखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अवधूत ऊर्फ प्रफुल्ल राम खोडके (२४, रा. करतखेड) याला अटक केली आहे. करतखेड गावातील रहिवासी गजानन खेडकर आणि अवधूत खोडके या कुटुंबीयांत मागील काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू होते. अवधूत खोडकेच्या घरासमोर गुरे बांधली असतात, त्या कारणावरून यापूर्वी गजानन खेडकर यांनी अवधूतला हटकले होते. तसेच, गजानन खेडकर यांच्या घराशेजारी एक खुला भूखंड आहे, जो खेडकर यांच्या नातेवाईकांचा आहे. त्यावरूनही खोडके आणि खेडकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. दरम्यान, ११ नोव्हेंबरला सकाळी साडेअकरा वाजता अवधूत ट्रॅक्टरचा टायर बदलत होता. त्यावेळी पुन्हा एकदा याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी चार वाजता अवधूतने ट्रॅक्टर दुरुस्त केला आणि तो गावातून ट्रॅक्टर घेऊन जात होता. त्यावेळी पुन्हा एकदा गजानन खेडकर आणि अवधूत यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी मात्र अवधूतने क्षणाचाही विचार न करता खेडकर यांना ट्रॅक्टरची जोरदार धडक दिली. या धडकेत ते खाली पडले. ते सावरून उठण्यापूर्वीच अवधूतने पुन्हा ट्रॅक्टर रिव्हर्स घेऊन त्यांच्या अंगावर चढवला. यामध्ये ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली खेडकर यांचा चेहरा व शरीराचा भाग पूर्णपणे चिरडला गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर ट्रॅक्टर चालक अवधूत ऊर्फ प्रफुल्ल खोडके याने गावातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच येवदाचे ठाणेदार प्रफुल्ल गाडेकर पथकासह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शोध घेतला असता आरोपी पसार झाला होता. मात्र, १२ नोव्हेंबर रोजी पहाटे येवदा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली. अकरा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ मध्ये खेडकर आणि खोडके कुटुंबीयांमध्ये याच कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांविरोधात येवदा पोलिसांत तक्रारही नोंदवली होती व त्या तक्रारींवरून दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी मारहाणीच्या कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते. अकरा वर्षांपासून धुमसत असलेल्या या वादाचे अखेर रक्तरंजित रूपांतर झाले. ^आरोपीला आम्ही १२ नोव्हेंबरला अटक केली होती. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती. शुक्रवारी त्या आरोपीला एमसीआर मिळाला आहे. – प्रफुल्ल गाडेकर, ठाणेदार, येवदा.
Source link
जागेच्या क्षुल्लक वादातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टरने चिरडून खून:मारेकरी ट्रॅक्टर चालकाला अटक, येवदा ठाण्याच्या हद्दीतील करतखेड गावात घडली घटना