Headlines

"भविष्यात AI मुळे 70 टक्के रोजगाराचे स्वरूप बदलणार":CM देवेंद्र फडणवीसांची माहिती; रामदेवबाबा विद्यापीठात AI लॅबचे उद्घाटन




नागपूरच्या रामदेव बाबा अभिमत विद्यापीठात विकसित करण्यात आलेल्या अद्ययावत AI लॅब तसेच सुपर कम्प्युटरच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केले. बनवारीलाल पुरोहित यांनी स्थापन केलेली ही खाजगी संस्था आज विदर्भ आणि देशातील एक उत्तम व अग्रणी संस्था म्हणून ओळखली जात असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले की, रामदेव बाबा विद्यापीठ येथे आज AI लॅबचे उद्घाटन होत आहे याचा मला फार आनंद आहे. या संस्थेने केवळ शिक्षणालाच नव्हे तर संशोधनालाही प्राधान्य दिले आहे, हे अधोरेखित करताना ते आपल्या भावना व्यक्त करत पुढे म्हणाले, येथे केवळ शिक्षण नाही तर संशोधनाला बळ दिले, त्यामुळे हे विद्यापीठ लवकरच देशातील महत्त्वाच्या विद्यापीठात समाविष्ट होईल. यासोबतच, भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावाविषयी बोलताना, “तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पिकाच्या एका फोटोवरून शेतकऱ्यांना अचूक सल्ला मिळू शकतो पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, AI हे भविष्य आहे. आमच्या शिक्षणसंस्थांनी संशोधन करण्याची हीच योग्य वेळ आहे. रोबोटिक्स, बायो टेक्नॉलॉजी आणि इतर सर्व क्षेत्रात तंत्रज्ञानांमुळे बदल होत आहे. तसेच AI तीव्रतेने सर्व काही बदलत आहे. AI क्षेत्रातील एका अत्यंत मोठ्या तज्ञ व्यक्तीने मला सांगितले की येणाऱ्या काळात रोजगाराचे स्वरूप बदलेल. किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल. रोजगार जाणार नाही, मात्र त्याचे स्वरूप बदलेल. देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वित्झर्लंडमध्ये वर्ष 2000 नंतर जन्मणारा प्रत्येक बालक किमान शंभर वर्ष जगेल, अशा स्वरूपात त्यांनी हेल्थकेअर सिस्टम विकसित केले आहे. आपल्या देशात ही वयोमान वाढत आहे. महाराष्ट्रात सरकारने ‘महाविस्तार’ नावाचे AI powered अँप विकसित केले आहे. त्याद्वारे महाराष्ट्राचे शेतकरी त्यांच्या स्थानिक बोली भाषेत तज्ञांशी संवाद साधून समस्या आणि त्यावरील उपाय विचारू शकतात. पिकांच्या एका फोटो द्वारे शेतकऱ्याला अचूक सल्ला आणि सूचना मिळू शकतो. हे AI चे कमाल आहे. रोजगार मिळवू शकतील असे तरुण घडवायचे आहेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, बाजारपेठेतील रोजगाराच्या उपलब्धतेनुसार शिक्षण संस्थांनी आपला अभ्यासक्रम निश्चित करणे अपेक्षित असून, आपल्याला केवळ पदवीधर नव्हे, तर प्रत्यक्ष रोजगार मिळवू शकतील असे तरुण घडवायचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. रामदेव बाबा अभिमत विद्यापीठात नेमक्या याच धर्तीवर कामकाज चालत असल्याचे कौतुक करत, आज उद्घाटन झालेली ही अद्ययावत AI प्रयोगशाळा या तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्यात उच्च दर्जाचे कुशल मनुष्यबळ निर्माण करेल, अशी अपेक्षाही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *