![]()
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय’, असे मोठे विधान केल्याने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, राजकारणातून निवृत्त व्हावेसे वाटत असले तरी जनतेचा प्रचंड उत्साह पाहून आपल्याला काम करण्यासाठी नव्याने उभारी मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, या संवादादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे विशेष कौतुक करताना, ‘पंतप्रधान मोदी हे खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाचे आणि उज्ज्वल भविष्याचे ‘फ्रेंड’ आहेत’, अशा शब्दांत त्यांच्या नेतृत्वाची स्तुती केली आहे. परळी महामार्गाच्या दुरावस्थेवर भाष्य करताना पंकजा मुंडे यांनी भावनिक वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, या रस्त्यावर खडकत-खडकत आले आणि पीएला म्हणाले, आता कंटाळा आला आहे. राजकारणातून रिटायर्ड व्हावे वाटत आहे. मात्र सभेच्या ठिकाणी आल्यानंतर नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आपल्याला नव्याने प्रेरणा मिळाल्याचे मुंडे यांनी म्हटले. ही लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, तर तुमचा विकास करण्यासाठी आहे, असेही पंकजा यांनी यावेळी म्हटले. नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे केले कौतुक पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीबाबत सांगितलेला एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतील हा खास प्रसंग त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून उलगडून सांगितला. पंकजा मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महत्त्वाच्या बैठकीसाठी त्या स्वतः दोन ते तीन दिवस दिल्लीत उपस्थित होत्या. या बैठकीच्या अगदी शेवटच्या दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला अमेरिकेचा प्रदीर्घ आणि अधिकृत दौरा पूर्ण करून थेट या बैठकीच्या ठिकाणी पोहोचले होते. मोदींनी या देशालाच आपला परिवार मानले प्रवासाचा कोणताही थकवा चेहऱ्यावर न जाणवू देता, पंतप्रधानांनी प्रत्येक मतदारसंघाचा अत्यंत सविस्तर आढावा घेतला आणि स्थानिक प्रश्न, संघटनात्मक बाबी तसेच विकासकामांवर सखोल चर्चा केली. विशेष बाब म्हणजे, ही महत्त्वपूर्ण बैठक सलग साडेआठ तास चालली आणि या प्रदीर्घ वेळात केवळ दोन वेळा चहा तर एकदा कॉफीसाठी अल्प विश्रांती घेण्यात आली. या संपूर्ण वेळेत पंतप्रधान प्रत्येक विषयात बारकाईने लक्ष घालून चर्चा करत असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. या अनुभवातून पंतप्रधानांची राष्ट्राप्रती असलेली अतूट भावनिक बांधिलकी अधोरेखित करताना त्या शेवटी म्हणाल्या की, “ज्यांना स्वतःचा परिवार नाही, त्यांनी या संपूर्ण देशालाच आपला परिवार मानले आहे.”
Source link
'मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय':मंत्री पंकजा मुंडे यांचे वक्तव्य चर्चेत; पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही केले भरभरून कौतुक