Headlines

भागवत कथेच्या माध्यमातून जीवन आदर्श बनवा- सुजीत महाराज देशमुख:हातरूण येथे जय हनुमान मित्र मंडळ व नर्मदेश्वर संस्थानतर्फे आयोजन‎




भागवत धर्मात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा उत्तम संगम आहे. भक्ती, नामस्मरण आणि सत्संगामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि मनात सात्विक विचारांचा प्रवाह वाढतो. अहंकार गेल्याशिवाय माणसाला खरी शांती मिळत नाही. कलियुगात भक्तीला “श्रेष्ठ मार्ग’ मानले गेले आहे, असे प्रतिपादन भागवताचार्य सुजीत महाराज देशमुख यांनी केले. ते बाळापूर तालुक्यातील हातरूण येथील जय हनुमान मित्र मंडळ व नर्मदेश्वर संस्थानतर्फे आयोजित श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहात हितोपदेश करीत होते. सोहळा हातरूण येथील हनुमान मंदिर व नर्मदेश्वर मंदिर येथे सुरु आहे. मानवी जीवनाबाबत सुजीत महाराज देशमुख म्हणाले की, मानवी जीवन अत्यंत धकाधकीचे आहे. जीवनात वेळेला प्रत्येकाने महत्व देणे आवश्यक आणि महत्वाचे आहे. श्रीमद् भागवत कथेचे श्रवण “जीवन जगण्याची कला’ शिकवते. भागवत कथेच्या माध्यमातून आपण आपले जीवन आदर्श बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कार्य महत्वाचे आहे. दिवा हा “मंगल’ मानला जातो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने होते. संध्याकाळी दिवा लावल्याने घरात चैतन्य निर्माण होते. त्यामुळे घराघरात दीप प्रज्वलित करणे गरजेचे आहे. कोणाचे मन आपल्याकडून दुखावले जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन महाराजांनी केले. लग्नाचा मुहूर्त पत्रिकेत लिहलेला असतानाही अनेक लग्न वेळेवर लागत नाहीत. यावर विचार करण्याची वेळ आता आली आहे, असेही त्यांनी नमूद केले. अशी होणार सांगता : सप्ताहाची सांगता मंगळवार, १४ एप्रिल रोजी होईल. पहाटे ५ ते ६ काकडा, सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ५ भागवत कथा. सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ८:३० ते १०:३० हरिकिर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होत आहेत. श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थित राहण्याचे आवाहन जय हनुमान मित्र मंडळ व नर्मदेश्वर संस्थान हातरुण यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *