![]()
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशातर्फे आयोजित ‘युवा शक्ती जागर यात्रे’चा पश्चिम महाराष्ट्रातील टप्पा पुणे शहरातून सुरू झाला आहे. या यात्रेचा मुख्य उद्देश युवाशक्तीला संघटित करणे आणि सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवणे हा आहे, असे भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोकण विभागातील प्रवास पूर्ण झाल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात ही यात्रा पोहोचली आहे. पुणे दौऱ्यादरम्यान महाडिक यांनी युवकांचे प्रश्न, त्यावरच्या उपाययोजना, संघटना मजबूत करणे आणि विविध समकालीन विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ आणि सहप्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. कृष्णराज महाडिक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या यात्रेचा उद्देश राज्यातील तरुणांच्या प्रश्नांवर त्यांच्याशी थेट संवाद साधणे, नवीन तरुणांना राष्ट्रकार्याशी जोडणे आणि सरकारच्या योजनांची माहिती घराघरात पोहोचवणे हा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यात विविध जिल्ह्यांमध्ये मेळावे, संवाद सत्रे आणि रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या यात्रेच्या माध्यमातून परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. यात्रेला युवा पिढीचा मोठा प्रतिसाद मिळत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. भाजप युवा मोर्चा यापुढे गणेश मंडळांशी चर्चा करून त्यांच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होईल. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, या संदर्भात विविध विषयांवर उपक्रम राबवले जातील. युवा मोर्चा केवळ पदाधिकाऱ्यांना भेटण्याऐवजी, प्रत्येक जिल्ह्यातील तरुणांच्या विविध प्रश्नांवर आणि विकासाच्या मुद्द्यांवर काम करेल. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यासाठी सरकारसोबत समन्वय साधला जाईल. ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकार दुर्दैवी असल्याचे महाडिक म्हणाले. या संदर्भात विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण तयार आहोत. यातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि सीबीआय चौकशीतून सत्य समोर येऊन आरोपींना शिक्षा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पेपरफुटीचा प्रकार चुकीचा असून, ‘नीट’ विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा मोर्चा ठोस भूमिका मांडेल, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.
Source link
'भाजयुमो'ची युवा शक्ती जागर यात्रा पश्चिम महाराष्ट्रात:पुण्यातून दौऱ्याला प्रारंभ; कृष्णराज महाडिक यांनी सांगितली उद्दिष्टे