![]()
“कवी हा संस्कृतीला प्रश्न विचारतो. त्यामुळेच भारतीय तत्त्वज्ञानाचा जो संघर्ष आहे, तो समजून घेतला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अनिल सकपाळ यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनच्यावतीने साहित्यिक बाबुराव बागुल यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मूळ अमरावतीकर असलेले ज्येष्ठ कवी व साहित्यिक शिवा इंगोले यांच्या अक्षराचा तिसरा डोळा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार व अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. मुणगेकर म्हणाले की, शिवा इंगोले यांनी आपल्या कवितेत पौराणिक संदर्भांचा अत्यंत समर्पक वापर केला आहे. त्यांची कविता बाबुराव बागुल यांच्या साहित्य प्रतिमेशी नाते सांगणारी असून, प्रगल्भ साहित्यिक हा जीवनाचा खरा भाष्यकार असावा लागतो. प्रमुख पाहुणे डॉ. अनिल सकपाळ पुढे म्हणाले की, शिवा इंगोले यांची कविता माणसांच्या तत्त्वज्ञानावर बोलते आणि माणसांचा शोध घेते. त्यांची संपूर्ण कविता बौद्ध तत्त्वज्ञानावर उभी आहे. दलित, शोषित व पुरोगामी चळवळीचा मोठा वारसा लाभलेल्या अमरावती जिल्ह्यातून आलेल्या कवी शिवा इंगोले यांच्या साहित्यातून नेहमीच विद्रोही विचार, मानवी मूल्ये आणि सामाजिक समतेचा पुरस्कार केला गेला आहे. अक्षराला विवेकाचा ‘तिसरा डोळा’ मानून त्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे काम या संग्रहातून केले आहे. या सोहळ्याला माजी न्यायाधीश डी. के. सोनवणे, प्रा. रामप्रसाद तोर आणि प्रा. कुसुम त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे सचिव ॲड. नाना अहिरे यांनी केले, सूत्रसंचालन सुधाकर सरोदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप नाईक यांनी केले. या कार्यक्रमाला मुंबई व विदर्भातील अनेक रसिक व साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
भारतातील तत्त्वज्ञानाचा खरा संघर्ष समजून घेणे गरजेचे- डॉ. सकपाळ:कवी शिवा इंगोले यांच्या काव्यसंग्रहाचे मान्यवरांकडून उत्साहात प्रकाशन