![]()
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरक म्हणणे हा 140 कोटी भारतीय जनतेचा, भारताच्या हजारो वर्षांच्या समृद्ध इतिहासाचा व भारतीय विचारांचा अवमान आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच प्रेरणा घेत ही टीका केली, असा घणाघात काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी भारताचा उल्लेख नरक असा केला होता. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मोदी मित्र डोनाल्ड ट्रंप यांनी भारताला नरक म्हणणे हा 140 कोटी भारतीय जनतेचा, भारताच्या हजारो वर्षांच्या समृद्ध इतिहासाचा आणि भारतीय विचारांचा अपमान आहे. मोदींनी स्वतः परदेशात जाऊन ” पूर्व जन्मात पाप केले म्हणून भारतात जन्म झाला असे लोक म्हणायचे” असे म्हणून याच समकक्ष भारताचा अपमान केला होता. त्यामुळे कदाचित मोदींकडूनच ही प्रेरणा ट्रंपने घेतली असावी. परंतु या ट्रंपना मोदी ठणकावून सांगणार नाहीत म्हणून आपण हे सांगणे आवश्यक आहे की जगाला अमेरिकेचा शोध हा भारतामुळे लागला. कोलंबस अमेरिकेच्या नव्हे तर भारताच्या शोधात तिथे पोहोचला. आणि सगळं जग हे भारत कुठे आहे याचा शोध घेत होते अमेरिका कुठे आहे याचा नव्हे, असे ते म्हणाले. अमेरिकेतील मूळ रहिवाशांना नेटीव्ह इंडियन्स म्हणतात सचिन सावंत म्हणाले, अमेरिकेतील मूळ रहिवाशांना नेटीव्ह इंडियन्स म्हणतात. अमेरिकेचा शोध घेणाऱ्यांना तो भारतच वाटला होता बरं! भारत हा जगाला अध्यात्मिक उन्नती व नैतिकता, मार्गदर्शन करणारा देश आहे. विश्र्वशांती व विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करणारा देश! हिंदू, बौद्ध, सीख , जैन इत्यादि अनेक धर्मांचा जन्म भारतात झाला. भारत हा महात्मा गांधींचा देश आहे ज्यांच्या प्रेरणेने अमेरिकेत मार्टिन ल्यूथर व दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला कृष्ण वर्णियांच्या अधिकारासाठी लढले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत आमचे काही प्रश्न असतील पण ती सोडविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. भारताच्या ग्राहक क्षमतेवर अमेरिकेची अर्थव्यवस्था अवलंबून आहे एवढं लक्षात ठेवा, असे सावंत यांनी म्हटले आहे. संजय गायकवाड यांच्यावरही निशाणा सचिन सावंत यांनी यावेळी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावरही निशाणा साधला. स्वर्गीय कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या “शिवाजी कोण होता” या पुस्तकाचे प्रकाशक व वितरक प्रशांत आंबी यांना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेली शिवीगाळ ही या व्यक्तीचे संस्कार दर्शविते. परंतु त्यांनी आंबी यांना दिलेल्या धमकी तून पानसरे यांच्या हत्येसंदर्भात गायकवाड यांना पूर्ण माहिती आहे हे स्पष्ट होते. किंबहुना त्यांचा सहभाग आहे का? याची चौकशी गायकवाड यांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलिसांनी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.
Source link
भारताला नरक म्हणणे हा 140 कोटी भारतीयांचा अवमान:अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी PM मोदींकडूनच प्रेरणा घेतली – काँग्रेस