![]()
वाघोली येथून देवगाव फाटा येथे मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका खासगी चालकाला अडवून चार अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवत रोख रक्कमेसह मोटारसायकल असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली. अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर मार्गावर भेंडाळा परिसरातील पेंढारकर फार्म हाऊसजवळ गुरुवारी पहाटे १:३० ते २ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मदन दगडुबा मोरे (३५, रा. देवगाव फाटा, ता. सेलू, जि. परभणी; सध्या रा. कटकेवाडी, वाघोली, पुणे) हे आपल्या मोटारसायकलवरून जात असताना चार जणांनी त्यांना रस्त्यात अडवले. आरोपींनी मोरे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील २० हजार रुपये रोख आणि ७० हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. या घटनेप्रकरणी मदन मोरे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक फरताडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, मुख्य रस्त्यावरच चोरीच्या घटना घडत असल्याने वाहनधारकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.
Source link
भेंडाळ्यानजीक चाकूचा धाक दाखवून चालकाची केली लूट:अहिल्यानगर मार्गावरील घटना, 90 हजारांचा मुद्देमाल लंपास