![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलिसांना भोंदू अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले. प्रस्तुत प्रकरणात कुणीही दोषी असला तरी त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक असला पाहिजे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणाचाही विस्तृत आढावा घेतला. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृहविभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी नाशिकच्या भोंदू अशोक खरात व आयटी धर्मांतर प्रकरणासह परतवाडा व गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचा विस्तृत आढावा घेतला. या बैठकीला पोलिस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री प्रस्तुत प्रकरणांत आरोपी कोण आहेत? हे न पाहता संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक सूत्रांच्या मते, मुख्यमंत्र्यांनी अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांच्या सुरक्षेवर प्राधान्यक्रमाने भर दिला. ते म्हणाले, प्रस्तुत प्रकरणातील पीडित महिलांना संपूर्ण विश्वास द्या. या प्रकरणी कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोर्टात ही केस मजबूत कशी होईल, हे निश्चित करण्यासाठी भक्कम पुरावे शोधा. तपासात अपराधसिद्धी हाच एकमेव महत्त्वाचा घटक असला पाहिजे. नाशिक धर्मांतराची घेतली गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराच्या घटनेचीही गंभीर दखल घेतली. राज्यात धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणले. त्यांचे अभिनंदन. पण आता तेवढाच दमदार तपासही झाला पाहिजे. या प्रकरणातील सर्वच पॅटर्नचा तपास करा. कोणताही अँगल तपासून सूटू देऊ नका, असे ते म्हणाले. गोरेगाव ड्रग्ज व परतवाडा प्रकरणावरही भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गोरेगाव ड्रग्ज प्रकरण व परतवाडा प्रकरणावरही भाष्य करत पोलिसांना संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी ड्रग्जविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करावी. तरुणाच्या भविष्याशी निगडीत ही बाब आहे. त्यामुळे अशी प्रकरणे गांभिर्याने घेतली पाहिजे. परतवाडा प्रकरणातील पीडितांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यांना विश्वास दिले पाहिजे. या प्रकरणी संबंधित समाजसेवकांची मदत घेतली पाहिजे, असे ते पोलिसांना योग्य ते निर्देश देताना म्हणाले. हे ही वाचा… अखेर 18 वर्षीय तरुणी गेली तरी कुठे?:हात हवेत वर करत कुणीतरी खेचून नेल्यासारखी एकटीच चालत गेली; चक्रावून टाकणारी घटना धुळे शहरातील एक 18 वर्षीय तरुणी हवेत हात वर करत म्हणजे कुणीतरी हाताला धरू नेल्यासारखे अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी अत्यंत गुढपणे चालत जात असल्याची दिसून येत आहे. वाचा सविस्तर
Source link
भोंदू खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश; धर्मांतर प्रकरणाचाही घेतला आढावा