![]()
नाशिकमधील गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून आरोपांच्या कचाट्यात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. तब्बल २८ दिवसांनंतर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली बाजू मांडताना त्यांनी, हे संपूर्ण प्रकरण आपल्या कुटुंबाला बदनाम करण्याचा एक ‘कुटील डाव’ असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. तसेच, बीडमधून आलेल्या त्या निनावी पत्राची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने (SIT) सोमवारी रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची तब्बल ८ तास चौकशी केली. या चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना प्रतिभा चाकणकर यांनी खळबळजनक दावा केला होता. “समता पतसंस्थेत माझ्या नावे असलेली खाती बनावट असून त्यावरच्या सह्या माझ्या नाहीत. देवदर्शनासाठी खरातने घेतलेल्या कागदपत्रांचा त्याने गैरवापर केला असावा,” असे त्यांनी स्पष्ट केले होते. प्रतिभा चाकणकरांच्या प्रतिक्रियेनंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. याच पार्श्वभूमीवर रूपाली चाकणकर यांनी आता सोशली मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेमके काय म्हणाल्या रूपाली चाकणकर? रूपााली चाकणकर आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले,त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले. मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे. याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले. तसेच, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले, हे घडवून आणण्यामागे कुणाचे “सौजन्य “होते हे समोर आले पाहिजे, अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी केली. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही, हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे. तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले, कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे, अशीही मागणी रूपाली चाकणकर यांनी केली. यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. केवळ तर्कवितर्क, अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय, बदनाम केले जात आहे, हे अत्यंत खेदजनक आहे. मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे. खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही. शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच, असा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला.
तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही कारण SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू असल्याचे रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.
Source link