![]()
बागलाण तालुक्यात नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दर महिन्याच्या एका मंगळवारी विशेष आढावा बैठक घेऊन ‘मंगळवार पॅटर्न’ राबविण्यात येणार असल्याची घोषणा पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी केली. शहरातील राधाई मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. खैरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांच्या निधनानंतर संघटनेत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात पक्षाला नवचैतन्य प्राप्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या पक्षवाढीसाठीच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. मेळाव्यात राजेंद्र सोनवणे, प्रेरणा बलकवडे, बाळासाहेब कर्डक, आकाश पगार, ज. ल. पाटील, खेमराज कोर, फईम शेख, वसंतराव भामरे, किशोर याळीज आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच सटाणा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या ॲड. हुमेरा शेख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. टी. सोनवणे यांनी, तर सूत्रसंचालन शशिकांत कापडणीस यांनी केले. मेळाव्यास पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मतदार यादी पुनरिक्षणाची तहसीलदारांकडून जागृती मेळाव्यादरम्यान बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. मतदान नोंदणी, नाव दुरुस्ती, पडताळणी आणि मतदार यादी अद्ययावत ठेवण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली. आमदार नसणाऱ्या ठिकाणी उपक्रम ^ज्या तालुक्यात पक्षाचा आमदार नाही, त्या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न आणि अडचणी सोडविण्यासाठी दर महिन्याला आढावा बैठक आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. जनतेच्या तक्रारींची दखल घेऊन त्या शासकीय स्तरावर पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी पक्षाच्या वतीने ‘मंगळवार पॅटर्न’ राबविण्यात येणार आहे. – दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Source link
मंगळवार पॅटर्नच्या माध्यमातून राष्ट्रवादी जनतेचे प्रश्न सोडविणार:सटाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष खैरे यांची माहिती