![]()
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली असून शिवसेन शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता यांच्याकडून युक्तीवाद करण्यात आला आहे. यापूर्वीच्या सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला होता. आता शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात येत असून विरोध आणि पक्षविरोध हे वेगळे असल्याचे मेहता यांनी म्हटले आहे. तसेच मधू दंडवते यांनी देखील याचा यापूर्वी उल्लेख केल्याचे मेहता यांनी यावेळी म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिल्याविरोधात ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा युक्तीवाद सुरू असून शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता यांच्याकडून युक्तीवाद केला जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करताना म्हणाले की, एखाद्या मुद्यावर पक्षातील लोकांचे मत वेगळे असू शकते. विरोध आणि पक्षविरोध हे दोन्ही वेगळे आहे. मतदान केले नाही म्हणून अपात्र ठरत नाही, असा युक्तीवाद मेहता यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच पक्षातही निवडणूक प्रक्रिया होते असेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षाची बैठक बोलावली नव्हती तसेच वर्तन हे पक्षाचे नेतृत्व करणाऱ्याचे होते, ते बरोबर असल्याचे ध्रुव मेहता यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षाची बैठक बोलावली नव्हती, जी बैठक बोलावली होती ती विधिमंडळ पक्षाची होती. त्याचबरोबर ‘किहोतो’ प्रकरणात 10 व्या अनुसूचीची वैधता हा मुख्य मुद्दा होता, असा युक्तीवाद मेहता यांनी केला आहे. अपात्रतेचे परिणाम म्हणजे सभागृहातील सदस्यत्व रद्द होणे ही बाब लक्षात घेता परिच्छेद 2 (1) ब अंतर्गत अपात्रतेस कारणीभूत असलेला अध्यादेश किंवा व्हीप अशा प्रकारे शब्दबद्ध केला जाणे योग्य ठरेल, असा युक्तीवाद मेहता यांनी केला आहे. यावेळी मेहता यांनी सुनील प्रभू यांनी जो व्हीप बजावला होता तो सुप्रीम कोर्टात वाचून दाखवला व यात कोणतीही स्पष्टता नाही असा युक्तीवाद मेहता यांनी केला आहे. ही बातमी आम्ही सातत्याने अपडेट करत आहोत..
Source link
मतदान न केल्याने कुणी अपात्र ठरत नाही:सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू