![]()
हिंगोलीचे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय म्हणजे नांव मोठे अन लक्षण खोटे असा प्रकार झाला असून या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच आता सीटीस्कॅन यंत्रणा देखील बंद असल्याने रुग्णांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हिंगोली येथील शासकिय रुग्णालयाची इमारत झाल्यानंतर या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रु्गणांची संख्या चांगलीच वाढली आहे. शहरी भागांसोबतच सेनगाव, हिंगोली, कळमनुरी तालुक्यातील रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात. मात्र या ठिकाणी रुग्णांना पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. अपघातातील किरकोळ जखमींसह इतर किरकोळ आजारी रुग्णांना उपचारासाठी नांदेड येथे पाठविले जात होते. त्यामुळे शासकिय रुग्णालय आहे कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान, हिंगोलीत शासकिय वैद्यकिय महाविद्यालय सुरु झाल्यानंतर तज्ञ डॉक्टरांची संख्या वाढून रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाला मान्यता मिळाल्यानंतरही आरोग्य सुविधांची गैरसोय कायम आहे. या ठिकाणी किरकोळ अपघातातील जखमी रुग्णांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविले जात आहे. त्यामुळे वैद्यकिय महाविद्यालयाचाही रेफर रेट शासकिय रुग्णालया प्रमाणेच कायम आहे. दरम्यान, शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात असलेली सीटीस्कॅन यंत्रणा मागील दिड महिन्यापासून बंद आहे. सीटीस्कॅन बंद असल्यामुळे रुग्णांचे हाल सुरु असून या रुग्णांना सीटीस्कॅन करण्यासाठी खाजगी दवाखान्यात जावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. या प्रकारामुळे अत्याधुनिक आरोग्य सेवेची घोषणा फोल ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे. याप्रकाराबाबत शासकिय वैद्यकिय महाविद्यालय प्रशासन मात्र शासनाकडे बोट दाखवून हातावर हात देऊन बसले आहे. सीटीस्कॅन कधी सुरु होणार याची प्रतिक्षा रुग्णांना लागली आहे. लाखो रुपये खर्चुन उभारण्यात आलेली यंत्रणा आता धुळखात पडल्याने वैद्यकिय महाविद्यालय प्रशसानाच्या कार्यपध्दतीवर चौफेर टिका होऊ लागली आहे. सीटीस्कॅन यंत्रणा तातडीने सुरु करा- निनाजी कांडेलकर सामाजिक कार्यकर्ते निनाजी कांडेलकर म्हणाले, वैद्यकिय महाविद्यालयातील सीटीस्कॅन बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून प्रशासनाने तातडीने यंत्रणा सुरु करावी. सीटीस्कॅन एक महिन्यात सुरु होईल- डॉ. चक्रधर मुंगल शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल म्हणाले, रुग्णालयातील सीटीस्कॅन यंत्रणा पुर्वी शासकिय रुग्णालयाकडे होती. आता वैद्यकिय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत झाली आहे. शासनस्तरावरूनच काही कराराच्या तांत्रीक बाबी राहिल्या असून पुढील एक महिन्यात सीटीस्कॅन सुरु होईल. मात्र सध्या एमआरआय सुरु असल्याने त्यावरच काम भागत आहे.
Source link
हिंगोली शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील सीटीस्कॅन यंत्रणा बंद:रुग्णांचे हाल, अधिकारी म्हणतात एक महिना लागणार