![]()
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे अवैध सावकारीच्या संशयावरून जिल्हा उपनिबंधकाच्या पथकाने एका महिलेच्या घरावर बुधवारी ता. १८ छापा टाकला. यामध्ये घरातून एक इस्सार चिठ्ठी, दोन बाँण्डसह इतर कागदपत्रे सापडली आहेत. यावरून आता पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे. याबाबत सहकार विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे एका महिला अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार सहकार विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यावरून जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी तातडीने पथक स्थापन केले होते. या पथकाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सहाय्यक निबंधक बालाजी पठाडे, शिवशंकर आंधळे, मनोज वानखेडे, के. जी. घासेवाड, पोलिस कर्मचारी एन. एस. बडे, एम. एन. गायकवाड यांच्या पथकाने गोरेगाव येथे जाऊन त्या महिला सावकाराच्या घरावर छापा टाकला. यामध्ये पथकाने घराची तपासणी केली असता घरात एका खोलीमध्ये ठेवलेली इस्सार पावती, एक पैसे घेतल्याचे नमुद केलेली चिठ्ठी, दोन बाँण्ड व इतर कागदपत्रे आढळून आली आहेत. या पथकाने सदर कागदपत्रे जप्त करून ताब्यात घेतली. त्यानंतर सविस्तर पंचनामाही केला आहे. दरम्यान, पथकाने जप्त केलेल्या कागदपत्रांची तपासणी करून त्यावर उल्लेख असलेल्या नांवाच्या व्यक्तींना जवाबासाठी बोलावले जाणार आहे. त्यांच्या जवाबानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सहकार विभागाच्या सुत्रांनी सांगितले. या कारवाईमुळे गोरेगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अवैध सावकारीच्या संशयावरून छापा टाकण्यात आला असून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्यानंतर आता अधिक चौकशी केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
Source link
गोरेगाव येथे अवैध सावकारीच्या संशयावरून घरावर छापा:इस्सार चिठ्ठी, बाँण्ड पेपर सापडले, जिल्हा उपनिबंधकाच्या पथकाचा छापा; अधिक चौकशी सूरू