Headlines

Harshavardhan Sapkal Challenges Shinde Group Over Sonia Gandhi Book Row


काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत पुस्तकाची पाने फाडल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे

.

50 खोके एकदम ओके वाल्यांकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा व्यर्थ

सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र फाडण्याच्या घटनेवरून सपकाळ यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढवला. “जी गद्दार गँग ’50 खोके एकदम ओके’ या घोषणेसाठी ओळखली जाते, ज्यांनी भाजपला घाबरून शिवसेना फोडली, त्यांच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. एकदा त्यांनी ते पुस्तक नीट वाचावे, इंग्रजी येत नसेल तर समजून घ्यावे आणि मग त्यावर वाद-प्रतिवाद करावा.”

पुस्तकाच्या विक्रमी खपामुळे पोटशूळ

सोनिया गांधींनी आपल्या आत्मचरित्रातून सत्य, अहिंसा, प्रेम आणि करुणेचा ऐतिहासिक ठेवा देशासमोर मांडला आहे. या पुस्तकाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून विक्रमी खप होत आहे. यामुळेच भाजपच्या पोटात पोटशूळ उठला आहे. आगामी काळात शिंदे गटात फूट पडणार असल्याची चिन्हे दिसत असल्याने, भविष्यात भाजपमध्ये स्थान मिळावे यासाठीच शिंदे गटाचे नेते असे विकृत प्रकार करत असल्याचा टोला सपकाळ यांनी लगावला.

त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारणारे नाहीत

महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. ते तसे वागले म्हणून काँग्रेस तशाच खालच्या पातळीवर जाऊन उत्तर देणार नाही; तर आम्ही त्यांचा भ्रष्ट कारभार जनतेसमोर आणणार आहोत, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

वयाच्या 21 व्या वर्षी सून म्हणून आल्या, पंतप्रधानपद नाकारले; त्यागाचा अपमान अशोभनीय

सोनिया गांधी यांच्या जीवनप्रवासाची आठवण करून देत हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावरील टीका अशोभनीय असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, “सोनिया गांधी वयाच्या 21 व्या वर्षी सून म्हणून भारतात आल्या. त्यांच्या सासू इंदिरा गांधी यांनी या देशासाठी प्राण अर्पण केले आणि त्यांचे प्राण सोनियाजींच्या मांडीवर गेले. 1991 मध्ये त्यांचे पती राजीव गांधी यांच्या देहाच्या चिंधड्या झाल्या. पतीच्या निधनानंतर आणि 1989 नंतरही त्या भारतातच राहिल्या, मुलांवर चांगले संस्कार केले आणि संधी असूनही पंतप्रधानपद नाकारले. ज्यांच्या कुटुंबाला त्यागाची आणि बलिदानाची परंपरा आहे, अशा महिलेचे आत्मचरित्र फाडणे हे अत्यंत निंदनीय आहे.”

बाळासाहेबांचा फोटो फाटल्याच्या वादावर ‘बुद्धीची कीव येते’; शिंदे गटाचेही स्पष्टीकरण

दरम्यान, शिंदे गटाच्या पत्रकार परिषदेत प्रवक्त्या शायना एन. सी. यांच्या हातून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेले पान फाटल्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, “समोरच्यांच्या बुद्धीची कीव येते. त्या पुस्तकात बाळासाहेब ठाकरे, शहीद इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अनेक ऐतिहासिक संदर्भांचे फोटो आहेत. पुस्तक फाडून त्यांनी या सर्वच महापुरुषांचा अपमान केला आहे.”

दुसरीकडे, या वादावर शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुस्तकाच्या पान क्रमांक 201 वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘माफीवीर’ असा उल्लेख करून घोर अपमान करण्यात आला आहे. त्या पानावर बाळासाहेब ठाकरे मणिशंकर अय्यर यांना जोडे मारत असल्याचा फोटो होता; आम्ही मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला आहे, मात्र विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत, असे म्हात्रे म्हणाल्या. जोपर्यंत प्रकाशक पुस्तकातील ती 2 आक्षेपार्ह पाने काढून टाकत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी पुन्हा एकदा केली.

——————————————————————–

हेही वाचा…

सोनिया गांधींच्या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा दावा: शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतच फाडल्या सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती; उद्धव ठाकरेंवरही शरसंधान

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचा अत्यंत अवमानजनक उल्लेख करण्यात आल्याच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय निरुपम, शायना एन. सी. आणि महिला नेत्यांनी थेट कॅमेऱ्यांसमोर या पुस्तकाची आक्षेपार्ह पाने टराटरा फाडून तीव्र निषेध नोंदवला. “सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरेंना हा अपमान मान्य आहे का?” असा सणसणीत सवाल शिवसेना नेत्यांनी यावेळी उपस्थित केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.