रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे वाहतूक कोंडीत अडकल्याने 20 महिन्यांच्या चिमुकल्याचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेनंतर राज्य सरकारने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. राज्यात येत्या 2 तारखेपासून अद्ययावत अशा ‘हॉ
.
अलिबागच्या घटनेनंतर ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’चा विस्तार
अलिबागमधील दुर्दैवी घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, 2013-14 च्या दरम्यान राज्यात 108 रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली होती. आता नव्या निविदा प्रक्रियेद्वारे ही सेवा अधिक अद्ययावत केली जात आहे. नव्या रुग्णवाहिकांमध्ये ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. रुग्णवाहिकेत रुग्णाला घेतल्याक्षणीच तिथे आयसीयू बेडच्या धर्तीवर डॉक्टर्स आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणेमार्फत तात्काळ उपचार सुरू होतील. येत्या 2 तारखेला मुंबईत या अद्ययावत 108 सेवेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार असून, 300 नव्या रुग्णवाहिका सेवेत दाखल होतील.
आरोग्य संवाद यात्रा
सार्वजनिक आरोग्य विभागाचे काम अधिक गतिमान करण्यासाठी राज्यभरात ‘आरोग्य संवाद यात्रा’ सुरू करण्यात आली असून, याअंतर्गत आपण वर्धा आणि भंडारा जिल्ह्यांच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आलो आहोत. तसेच ‘महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट’च्या संदर्भात डॉक्टरांसोबत महत्त्वाची बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णालयांचे वार्षिक फायर ऑडिट अनिवार्य; दोषी कंपन्यांना काळ्या यादीत टाकले
भंडारा आणि अमरावती येथील रुग्णालयांमध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कडक पावले उचलली आहेत. अमरावती घटनेतील दोषी यंत्रणेवर कारवाई करण्यासोबतच संबंधित कंपनीला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्यात आले आहे. तसेच, खाजगी आणि शासकीय रुग्णालयांमधील व्हेंटिलेटरच्या वापराबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली (एसओपी) जाहीर करण्यात आली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व रुग्णालयांचे दरवर्षी ‘फायर ऑडिट’ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याच्या काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली असल्याचे आबिटकर यांनी स्पष्ट केले.
नागपूर जिल्हा रुग्णालयाचे हिवाळी अधिवेशनात लोकार्पण; बोगस प्रमाणपत्रांवर कारवाईचा इशारा
नागपूर येथील मानकापूर परिसरात तयार झालेल्या जिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार आगामी विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान केले जाईल. अशोक खरात याच्यावरील भ्रष्टाचाराच्या तक्रारी आणि परदेशातून एमबीबीएस करून एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण न होता बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर या प्रकरणाची सखोल माहिती घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मानसिक आधार
दुष्काळी परिस्थितीमुळे नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची स्वतंत्र मानसिक आरोग्य यंत्रणा (विंग) कार्यरत आहे. पुढील टप्प्यात ही यंत्रणा अधिक गतिमान करून शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. यासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 वर्षीय आजीला रील बनवण्याचे व्यसन लागून रुग्णालयात मोबाईल चोरल्याच्या घटनेवर बोलताना, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच मोबाईल वापराबाबत स्वतःवर काही बंधने आणि आचारसंहिता पाळणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
——————————————————————
हेही वाचा…
पक्षाला का वेठीस धरता?:रोहित पवारांनी स्वतःच ती वैयक्तिक पत्रकार परिषद असल्याचे सांगितले; सुप्रिया सुळेंची स्पष्टोक्ती; आव्हाडांवरही खुलासा

दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आमदार रोहित पवार यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. “रोहित पवार यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत सांगितले की ही पक्षाची पत्रकार परिषद नसून त्यांचे वैयक्तिक मत आहे. सशक्त लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असतो; मग त्यांनी स्वतःच स्पष्ट केले असताना तुम्ही पक्षाला का वेठीस धरता?” असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना विचारला. यासोबतच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, 5000 रुपयांची रखडलेली मदत, एसआरए घोटाळा, डीलिमिटेशन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींवर त्यांनी सविस्तर भाष्य केले. येथे वाचा संपूर्ण बातमी