![]()
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्र सेवा दलातर्फे 27 ते 29 नोव्हेंबरदरम्यान पुण्यात ‘फुले फेस्टिव्हल’ आयोजित केला आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन 27 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता खासदार शरद पवार यांच्या हस्ते होईल. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष अजित शिंदे उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील. डॉ. गणेश देवी, प्रकाश आंबेडकर, गोव्याचे ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होतील. तीन दिवसांच्या महोत्सवात साहित्य, कला, संगीत, सामाजिक प्रबोधन, वैचारिक चर्चा आणि लोकसंस्कृतीशी संबंधित कार्यक्रम होतील. पहिल्या दिवशी ‘महाजलसा-लोकलावंतांची संगीतबारी’ हा कार्यक्रम होईल. यात रघुवीर खेडकर, सुरेखा पुणेकर, कडुबाई खरात, शीतल साठे, सचिन माळी आणि पृथ्वीराज माळी सहभागी होतील. एकूण 200 लोककलावंत सादरीकरण करणार आहेत. 28 नोव्हेंबरला सकाळी भिडे वाडा ते फुले वाडा ‘फुले वॉक’ काढण्यात येईल. सायंकाळी प्रकाश आंबेडकर यांच्यासह मान्यवर ‘विचार संगीती’त सहभागी होतील. युवकांसाठी ‘यंग सोशलिस्ट संमेलन’ होईल. रात्री पद्मश्री प्रल्हाद टिपणिया यांचा ‘कबीरवाणी’ कार्यक्रम होईल. 29 नोव्हेंबरला राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य उत्सव होईल. यात दामोदर मावजो यांच्यासह साहित्यिक सहभागी होतील. महोत्सवात 50 पुस्तक दालने, विद्रोही साहित्य दालन, व्यंगचित्र संमेलन, खाद्यसंस्कृती, एकांकिका, चित्रपट आणि माहितीपट प्रदर्शन, शिक्षक साहित्य संमेलन तसेच एमपीएससी-यूपीएससी परीक्षार्थींसाठी मार्गदर्शनाचे कार्यक्रमही असतील. देशभरातील संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी ‘फुले @ 200’ परिषद आयोजित केली आहे. परिषदेत सुमारे 40 संशोधन निबंध सादर होतील. शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दासू वैद्य, तर उद्घाटक विश्वास पाटील असतील. श्री बृहद भारतीय समाज आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट हे प्रमुख सहकारी आहेत. महात्मा फुले यांचे सत्यशोधक आणि परिवर्तनवादी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा महोत्सवाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Source link
पुण्यात 27 ते 29 नोव्हेंबरला फुले फेस्टिव्हल:शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन; 200 लोककलावंत सादरीकरण करणार, प्रकाश आंबेडकरांसह मान्यवर सहभागी होणार