Headlines

कॅसिनोच्या नादात फळविक्री सोडून दुचाकी चोरीचा धंदा:24 वर्षीय तरुण अटकेत, 16 चोरीचे गुन्हे उघड




फळविक्रीचा व्यवसाय करत असताना कॅसिनोमध्ये जुगार खेळण्याच्या नादाला लागलेल्या २४ वर्षीय तरुणाने दुचाकी चोरीचा मार्ग अवलंबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरीच्या दुचाकी विकण्याऐवजी त्या गहाण ठेवून पैसे मिळवायचे आणि या पैशांत गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळायचा, अशी पद्धत त्याने अवलंबल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून १६ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. प्रदीप बाळू मस्के (वय २४, रा. तारदाळ, ता. हातकणंगले) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. इचलकरंजीतील अल्ताफ सद्दाम सनदी यांची दुचाकी घरासमोरून चोरीला गेल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. शहरातील वाहनचोरीच्या घटनांची उकल करण्यासाठी पोलिसांनी विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान प्रदीप मस्के याच्याबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, इचलकरंजी आणि कोल्हापूर शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरी केल्याचे समोर आले. त्याच्या चौकशीत चोरीच्या वाहनांचा वापर करून पैसे मिळवण्याची वेगळीच पद्धत उघड झाली. चोरीच्या दुचाकी विकण्याऐवजी गहाण ठेवल्या चोरी केलेल्या दुचाकींची विक्री करून पैसे मिळवण्याऐवजी संशयित त्या वेगवेगळ्या व्यक्तींकडे गहाण ठेवत होता. वाहनांच्या बदल्यात मिळणाऱ्या पैशांचा वापर तो गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. फळविक्रीचा व्यवसाय करत असताना त्याने वाहनचोरीचे सत्र सुरू केल्याचेही समोर आले आहे. चोरीच्या दुचाकी गहाण ठेवून त्यातून मिळणाऱ्या पैशांचा जुगारासाठी वापर केल्याने या प्रकरणात चोरीच्या वाहनांची विल्हेवाट लावण्याची पद्धत पोलिसांच्या तपासाचा महत्त्वाचा भाग ठरली आहे. आता चोरीच्या दुचाकी गहाण ठेवून घेणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १६ दुचाकी चोरी पोलिसांनी केलेल्या तपासात शहरातील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ७, गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ५, शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील एकूण १६ चोरीच्या दुचाकींपैकी १४ मोपेड पोलिसांनी जप्त केल्या आहेत. जप्त वाहनांची अंदाजे किंमत ४ लाख २० हजार रुपये आहे. उर्वरित दोन दुचाकींचा शोध सुरू असून, जप्त केलेल्या वाहनांचे मूळ मालक शोधून ती त्यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पुढे केली जाणार आहे. चोरीच्या वाहनांची माहिती देणाऱ्यांसह गहाण घेणाऱ्यांचीही चौकशी या कारवाईमुळे इचलकरंजी आणि कोल्हापूर परिसरातील वाहनचोरीच्या अनेक घटनांचा उलगडा झाला आहे. मात्र चोरीच्या दुचाकी गहाण ठेवून घेणाऱ्या व्यक्तींची भूमिका काय होती, त्यांनी वाहनांची कागदपत्रे तपासली होती का आणि या व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग होता का, याचाही तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तपास पथकाला २० हजारांचे बक्षीस पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, उपनिरीक्षक प्रवीण साणे, अनिल चव्हाण यांच्यासह तपास पथकाने वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा माग काढत संशयिताला अटक केली आणि चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. या पथकाने केलेल्या कामगिरीची दखल घेत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी टीमला २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी ही माहिती दिली. एकीकडे पोलिसांनी वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल करत चोरीच्या दुचाकी जप्त केल्याने या कारवाईचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे जुगाराच्या नादात फळविक्रीचा व्यवसाय सोडून चोरीच्या मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या संशयिताच्या कृत्याची कोल्हापूर परिसरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे —————————————————— हेही वाचा… सोनिया गांधींच्या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा दावा: शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतच फाडल्या सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती; उद्धव ठाकरेंवरही शरसंधान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचा अत्यंत अवमानजनक उल्लेख करण्यात आल्याच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय निरुपम, शायना एन. सी. आणि महिला नेत्यांनी थेट कॅमेऱ्यांसमोर या पुस्तकाची आक्षेपार्ह पाने टराटरा फाडून तीव्र निषेध नोंदवला. “सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरेंना हा अपमान मान्य आहे का?” असा सणसणीत सवाल शिवसेना नेत्यांनी यावेळी उपस्थित केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *