Headlines

मथुरामध्ये एक्स्प्रेसवेवर धावत्या एसी बसला लागली आग:20 फूट उंच ज्वाळा, MP च्या छतरपूरला जाणाऱ्या 40 प्रवाशांनी पळून जीव वाचवला




मथुरेत यमुना एक्स्प्रेस-वेवर शनिवारी रात्री दीड वाजता धावत्या डबल डेकर एसी बसला आग लागली. पाहता पाहता संपूर्ण बसमधून २० फूट उंचीच्या ज्वाळा उठू लागल्या. वेळीच बसमधील सर्व ४० प्रवाशांनी बाहेर पळून आपला जीव वाचवला. अग्निशमन दलाने दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत बस आणि त्यामध्ये ठेवलेले संपूर्ण सामान पूर्णपणे जळून खाक झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, बसच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. खजुराहो ट्रॅव्हल्सची बस दिल्लीहून मध्य प्रदेशातील छतरपूरला जात होती. बसला लागलेल्या आगीची २ छायाचित्रे… अपघाताच्या वेळी प्रवासी झोपले होते, धूर निघताच आरडाओरड सुरू झाली मध्य प्रदेशचा रहिवासी चालक जितेंद्र ४० प्रवाशांना बसमध्ये (MP 14 ZH 5063) बसवून दिल्लीच्या काश्मीरी गेटहून छतरपूरकडे निघाला होता. याचदरम्यान राया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यमुना एक्सप्रेस-वेवरील राया कट पुलावर बसला आग लागली. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी बहुतांश प्रवासी झोपलेले होते. अचानक बसमधून धूर निघू लागला आणि त्यानंतर बसमध्ये आरडाओरड सुरू झाली. सर्व प्रवासी घाबरले होते. चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर घाईघाईने सर्वजण बसमधून खाली उतरले, मात्र सर्वांचे सामान बसमध्येच राहून गेले. सीओ संजीव कुमार राय यांनी सांगितले, ‘शनिवारी रात्री १:३८ वाजता बसला आग लागल्याची माहिती पीआरव्हीला मिळाली. प्रभारी निरीक्षक पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवली. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *