![]()
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि मनसेचे ज्येष्ठ नेते दिलीप धोत्रे यांच्या फॉर्च्युनर कारला मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, सुदैवाने दिलीप धोत्रे आणि त्यांचे चालक बालंबाल बचावले आहेत. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. दिलीप धोत्रे हे मागील दोन दिवसांपासून कामानिमित्त दिल्ली दौऱ्यावर होते. गुरुवारी दुपारी १२ वाजता ते मुंबईत परतले. मुंबईतील महत्त्वाची कामे आटोपून रात्री १० वाजल्यानंतर त्यांनी मुंबईहून पंढरपूरकडे आपला परतीचा प्रवास सुरू केला. रात्रीच्या वेळी पुण्याजवळ तळेगाव दाभाडे परिसरात त्यांची फॉर्च्युनर कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका कंटेनरला पाठीमागून जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर तातडीने धोत्रे आणि चालकास पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच राज ठाकरे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, विजय चौगुले यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयात धाव घेऊन धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना धीर दिला. अपघाताची बातमी समजताच कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, दिलीप धोत्रे यांनी स्वतः एक व्हिडिओ संदेश प्रसारित करत “आपण सुखरूप आहोत, काही काळजी नसावी,” असे स्पष्ट केले आहे. यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Source link
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या कारला अपघात:दिलीप धोत्रे सुखरूप, किरकोळ जखमी पुण्यात उपचार