![]()
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि फुलंब्री तालुक्यातील मराठा समन्वयक किशोर बलांडे यांच्याविरोधात सोशल मीडिया व सार्वजनिक माध्यमातून सुरू असलेल्या बदनामीविरोधात फुलंब्री तालुका मराठा समाज बांधवांच्या वतीने बुधवारी तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यासंदर्भात तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्यात निवेदन देत खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. बुधवारी सकाळी दहा वाजता शेकडो मराठा समाज बांधव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एकत्र आले. तेथून तहसील कार्यालय ते फुलंब्री पोलिस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यानंतर तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. अजय बारस्कर आणि अमोल खुणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी पोलिस ठाण्यात एक तास ठिया आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलिस ठाण्यातून हलणार नाही, असा कडक पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सोनाली पाईकराव यांनी आंदोलकांची समजूत काढली. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवासह आदी समाज बांधव उपस्थित होते.
Source link
मनोज जरांगे पाटील, बलांडे यांच्या बदनामीविरोधात तहसीलवर मोर्चा:संबंधितांवर कारवाई करण्याची समाजाची मागणी