![]()
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या 18 वर्षांपासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी महायुतीतील मोठा घटक असलेल्या भाजपला अखेर ‘बॅकफूट’वर जावे लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. राज्यात सत्तावाटपात अजित पवार गट सोबत असल्याने विद्यमान आमदारांची हक्काची जागा मित्रपक्षाला सोडण्याशिवाय भाजपकडे अन्य राजकीय पर्याय उरलेला नाही. एकेकाळी हा मतदारसंघ भाजपचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. मात्र 2008 मध्ये सतीश चव्हाण यांनी भाजपच्या या वर्चस्वाला सुरुंग लावला. त्यानंतर भाजपच्या गोटातून ही जागा परत खेचून आणण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. यंदा ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने तब्बल दोन वर्षांपासून पूर्ण ताकदीने मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र महायुतीमधील राजकीय समीकरणांपुढे स्थानिक इच्छुकांचा हिरमोड होण्याची चिन्हे आहेत. मराठा कार्ड ते 2 लाख पदवीधरांच्या नोंदणीची यंत्रणा भाजपने पदवीधर मतदारसंघ जिंकण्यासाठी दोन वर्षांपूर्वीच माजी आमदार संजय केणेकर यांच्या खांद्यावर निवडणूक प्रमुखपदाची धुरा सोपवली होती. आ. सतीश चव्हाण यांना रोखण्यासाठी थेट मराठा चेहरा देण्याची रणनीती आखली. निवृत्त शिक्षणाधिकारी एन. के. देशमुख यांना पक्षात आणले. नोंदणीची जबाबदारी त्यांना दिली. तालुकास्तरावर बूथरचना केली. तब्बल 2 लाख पदवीधरांची नोंदणी केली. भाजपने तगडी मोर्चेबांधणी केली होती. मात्र आ. चव्हाण यांनी आधीच स्वतःला महायुतीचे अधिकृत उमेदवार घोषित करून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपने उभी केलेली यंत्रणा आता मित्रपक्षाच्याच दावणीला बांधली जाणार का, असा सवाल कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे. पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम भाजपच्या वतीने मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी 2 लाख मतदारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तालुकास्तरावर बूथरचना व काटेकोर व्यवस्थापन सज्ज आहे. आमची संपूर्ण यंत्रणा निवडणुकीसाठी सदैव तयार आहे. जागावाटपाबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल. – माजी आ. संजय केणेकर, निवडणूकप्रमुख, भाजप. मराठवाडा पदवीधर निवडीचा रणसंग्राम 18 वर्षे : आ. सतीश चव्हाण यांचे सलग 3 टर्म मतदारसंघावर वर्चस्व.
2 लाख : भाजपने गेल्या वर्षभरात केलेली विक्रमी पदवीधर मतदार नोंदणी.
3 वेळा भाजप पराभूत : 2008 मध्ये माजी आ. श्रीकांत जोशी, त्यानंतर सलग दोन वेळा शिरीष बोराळकर यांचा पराभव.
Source link
मराठवाडा पदवीधरचा रणसंग्राम:बालेकिल्ला राखण्यासाठी मित्रपक्षाला संधी, 2 लाख मतदार नोंदवूनही भाजपची माघार; सतीश चव्हाणांसाठी ‘महायुती’ धर्म