Headlines

‘महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही, मात्र संघर्ष टाळा’:उदयनराजेंचा नेत्यांना सल्ला; इच्छुकांच्या निवडणूक लढविण्याच्या अधिकाराचे समर्थन




राजकारणात प्रत्येकाची काही ना काही महत्त्वाकांक्षा असते. ती बाळगण्यात किंवा निवडणूक लढविण्यात गैर काय? मात्र, या महत्त्वाकांक्षेचे रूपांतर आपापसांतील संघर्षात होता कामा नये, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. त्याचवेळी जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या स्थानिक राजकीय वादांशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी सावध राजकीय अंतर राखले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी रविवारी मतदान सुरू असताना उदयनराजे यांनी सातारा शहरातील मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक आणि राजकीय महत्त्वाकांक्षेबाबत आपले मत मांडले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नऊ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित बारा जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांचे समर्थक आमनेसामने आले आहेत. काही ठिकाणी राजकीय प्रतिष्ठेच्या लढती रंगल्या असून, त्यातून स्थानिक पातळीवर मतभेदही उफाळून आले आहेत. मात्र, या संघर्षात आपल्याला ओढण्याचा प्रयत्न करू नये, अशीच उदयनराजेंची भूमिका त्यांच्या वक्तव्यातून दिसून आली. निवडणूक लढविणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. राजकारणात पुढे जाण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे कोणाच्या महत्त्वाकांक्षेकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याचे कारण नाही, असा सूर त्यांनी व्यक्त केला. मात्र, राजकीय स्पर्धा असली तरी त्यातून कटुता आणि संघर्ष निर्माण होऊ नये, याची काळजी नेत्यांनी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवले. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना उदयनराजेंनी कोणत्याही गटाची बाजू न घेता सर्वांनाच संयम राखण्याचे आवाहन केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेबरोबरच स्थानिक राजकीय संघर्षापासून त्यांनी राखलेले अंतरही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *