![]()
राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, २१ एप्रिलपासून राज्यव्यापी संपावर गेले आहेत. या संपामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल विभागाचे ८३५ कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या या संपात राज्यातील १७ लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल विभागात एकूण १०१२ कर्मचारी आहेत. त्यापैकी ८३५ कर्मचारी संपात सहभागी झाले, तर ३३ जण पूर्वपरवानगीने रजेवर होते. केवळ १४४ कर्मचारी कामावर हजर होते. संपात बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाल्याने सकाळपासून महसूल विभागाच्या सर्वच कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. दुपारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे आपल्या कामांसाठी आलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पैठण तालुक्यातील काही शेतकरी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते, परंतु कर्मचारी नसल्याने त्यांचे निवेदन स्वीकारले गेले नाही. त्यांना दोन तास अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागली. रसूल शेख यांच्यासह अनेक नागरिक कार्यालयात येऊन परत गेले. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक सुनावण्या लांबणीवर पडल्या. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील महसुली कामकाजही ठप्प झाले आहे. सह जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी विभागातील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने एकही दस्ताची नोंदणी झाली नाही. नोंदणी विभागातील अधिकारीही कार्यालयात गैरहजर होते. दरम्यान, मराठवाडा विभागातील महसूल विभागाचे कामकाजही या संपामुळे पूर्णपणे ठप्प झाले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये एकूण ७०६६ महसूल कर्मचारी आहेत. त्यापैकी तब्बल ५६२० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. ३२० कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर असून, केवळ ११२६ कर्मचारी कामावर हजर होते, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली. या मोठ्या सहभागामुळे संपूर्ण मराठवाड्यातील महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
Source link
महसूल कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी संपावर:संभाजीनगरमध्ये 835, मराठवाड्यात 5 हजार 620 कर्मचारी सहभागी