Headlines

महादेव खोरीसह वडाळी परिसरात बिबट्याची दहशत:नागरिक चिंतेत, नगरसेविका पंचफुला चव्हाण यांची वनविभागाकडे केली मागणी




शहराच्या पूर्व भागात असलेल्या महादेव खोरी, वडाळी आणि बागडे ले-आऊट परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. हा परिसर दाट नागरी वस्तीचा आहे. बिबट्या वारंवार पाळीव प्राणी व डुकरांची शिकार करीत आहे. त्यामुळे वडाळी व परिवारपुरा परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ९ च्या नगरसेविका पंचफुला संजय चव्हाण यांनी अमरावतीचे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांना पत्र देऊन या बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची आग्रही मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच राजुरा नाका परिसरात बिबट्याने एका सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, आता महादेव खोरी आणि बागडे ले-आऊट परिसरात बिबट्याचा वावर थेट सीसीटीव्हीत कैद झाला आहे. १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.२७ वाजताच्या सुमारास बागडे ले-आऊट येथील रहिवासी राहुल मेश्राम यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या स्पष्टपणे दिसून आला आहे. त्याने तेथे एका डुकराची शिकार केल्याचे उघड झाले आहे. या भागात बिबट्या पाळीव कुत्रे आणि इतर प्राण्यांना सतत आपले भक्ष्य बनवत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या, जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाच्या संथ कारभारावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोणतीही मोठी जीवितहानी होण्यापूर्वी वनविभागाने जागे व्हावे, अशी मागणी होत आहे. बिबट्याच्या भितीमुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना देखील करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. पाळीव कुत्र्यांना केले जातेय लक्ष्य बिबट्यापासून परिसरातील पाळीव प्राण्यांसह मनुष्यालाही धोका निर्माण झाला आहे. श्वानांसह मोकाट डुकरांनाही बिबट्या लक्ष्य बनवत आहे. पाळीव श्वानांची संख्या या परिसरात कमी झाली आहे. ज्यांच्याकडे पाळीव श्वान आहेत. ते आपल्या श्वासनास घरात ठेवत आहेत. जेणेकरून या श्वानांना रात्री बिबटापासून धोका होऊ नये.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *