![]()
“भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड हे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये समन्वय साधण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करत आहेत. त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर अशा भाषेत टीका करणे योग्य नाही,” असा स्पष्ट इशारा भाजप नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अतिवृष्टी नुकसानभरपाई, जात पडताळणी समिती, प्रशांत किशोर यांची सुनेत्रा पवारांसोबतची भेट आणि राज ठाकरे यांच्या आरोपांसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. नागपूरमधील पूरस्थिती आणि सुरक्षा व्यवस्थेवर बैठक नागपूरमधील नुकसानीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) च्या नियमांनुसार नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे काम शासन करत आहे. काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी नुकसान झाले आहे, मात्र सर्वांना मदत मिळेल याची काळजी सरकार घेईल. तसेच, नागपूरच्या सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने आणि अलीकडे घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण सोमवारी पोलीस आयुक्तालयात जाऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना घडू नयेत, याची जबाबदारी सरकार घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जात पडताळणी प्रमाणपत्र आणि फेटाळलेले अर्ज मराठा आणि ओबीसी समाजाच्या जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, जात पडताळणी समिती ही स्वायत्त संस्था असून ती उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत पारदर्शकपणे काम करते. कोणत्याही नेत्याला किंवा मंत्र्याला यात हस्तक्षेप करता येत नाही. प्रमाणपत्रांची वैधता नाकारण्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. मराठा समाजाचे केवळ 3 प्रस्ताव रद्द झाले आहेत, तर त्या तुलनेत ओबीसी समाजाचे सुमारे 117 प्रस्ताव समितीने फेटाळले आहेत. त्यामुळे समिती कोणावरही अन्याय करत नाही, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे महायुतीत कोणतीही फूट नाही निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, यावर बावनकुळे यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली. “राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एक अलिखित आचारसंहिता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकमेकांना ‘डॅमेज’ करणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भेटीमुळे महायुतीत कोणतीही शंका निर्माण होणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लक्ष्मण हाकेंना टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत इशारा दिला होता. यावर कडक शब्दांत आक्षेप घेत बावनकुळे म्हणाले, “प्रसाद लाड हे भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष होऊ नये, यासाठी ते समन्वयक म्हणून काम करत आहेत. प्रसाद लाड कधीही असंस्कारी काम करत नाहीत. त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी त्यांच्याबद्दल असे बोलणे चुकीचे असून त्यांनी अशी विधाने टाळावीत.” राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर मतदार नोंदणी मोहिमेत भाजपचे कार्यकर्ते सरकारी अधिकाऱ्यांसोबत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना बावनकुळे म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक पक्षाचे ‘बूथ लेव्हल एजंट’ (BLA) असतात, ज्यांची जबाबदारी सरकारी ‘बूथ लेव्हल ऑफिसर’ला (BLO) मदत करणे हीच असते. एखादा मतदार सापडत नसेल तर त्याला शोधून देणे हे BLA चे काम आहे. मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाही विनंती करतो की, त्यांनीही आपल्या पक्षाचे BLA नेमावेत आणि अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. यात काहीही वावगे नाही. हातमाग आणि स्वदेशीला प्रोत्साहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच हातमाग उत्पादने खरेदी करण्याचे आणि त्याचे व्हिडीओ शेअर करण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमाचे स्वागत करत बावनकुळे म्हणाले की, मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या काळात स्वदेशी आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर (MSME) सर्वाधिक भर देण्यात आला आहे. कोराडी येथील 400 महिला कामगारांनी मोदींचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. केवळ व्हिडीओ शेअर करून न थांबता सर्वांनी ‘विकसित भारता’साठी हातमाग उत्पादनांचा प्रत्यक्ष वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. हेही वाचा… मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचा सरकारचा कट!: नेत्यांची पोरं परदेशात, कार्यकर्त्यांच्या लेकरांसाठी मी लढतोय; पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या सुरुवातीलाच जरांगेंचा घणाघात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आगामी २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज अंतरवाली सराटी येथून आपल्या ‘पश्चिम महाराष्ट्र’ दौऱ्याला सुरुवात केली आहे. हा दौरा १२ ऑगस्टपर्यंत चालणार असून, यादरम्यान ते विविध जिल्ह्यांत जाऊन समाजाशी संवाद साधणार आहेत. मात्र, दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वीच माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सत्ताधारी नेत्यांवर आणि सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी निवडणुका जिंकण्याची भाजपची पद्धत ‘फ्रॉड’:राज ठाकरेंचा आरोप, मोहन भागवतांच्या विद्यार्थी संवादावर म्हणाले- उशीर झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून, आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी राज्याची सद्यस्थिती, नाशिकमधील खड्डे, ‘नीट’ परीक्षेतील घोळ आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज्य व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “सगळी शहरे बर्बाद होत आहेत, तरीही तुम्ही भाजपच्या लोकांना निवडून देत असाल तर भोगा,” अशा शब्दांत त्यांनी नाशिककरांना आणि जनतेला खडेबोल सुनावले. सविस्तर वाचा
Source link
महायुतीत एकमेकांना डॅमेज करायचं नाही हे ठरलेलं!:प्रशांत किशोर-सुनेत्रा पवार यांच्या भेटीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया, लक्ष्मण हाकेंनाही सुनावले खडे बोल